पैठण : तालुक्यातील हिरडपुरी येथे अवैध वाळू उपसा करणारे पकडलेले वाहन सोडण्यासाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना महसूल विभागातील खासगी एजंट सलील करीम शेख ( ३८ , व्यवसाय शेती, रा. लक्ष्मीनगर, ता. पैठण) यास अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पैठणचे तहसीलदार सारंग भिकुर्सिंग चव्हाण ( ४८, रा. ए विंग, फ्लॅट नं 305, द प्राईड इग्निमा, फेज-1, सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यास देखील पथकाने ताब्यात घेतले आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी ५ वाहने पकडली होती. यातील एका वाहनाचा दंड वसूल करूनही ते वाहन पैठणच्या महसूल विभागाकडून सोडण्यात येत नव्हते. हे वाहन सोडण्यासाठी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती २ लाख रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानुसार ८ ते १० दिवसांपूर्वी ९० हजार रुपये तक्रारदाराने संबंधित एजंट सलिल शेख यास लाच दिली होती. तसेच अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदविली होती. त्यानुसार या विभागाने हिरडपुरी येथे उर्वरित १ लाख १० हजार रुपयांची रक्कम देण्याबाबत सापळा लावला. सोमवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून खासगी वसुली करणारा एजंट सलिल शेख १ लाख १० हजार रुपयांची लाच घेत असताना या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याचा जबाब घेऊन पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यास देखील पथकाने ताब्यात घेतले.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घराची झडतीअहिल्यानगर येथील एसीबीच्या पथकाकडून रात्री १२:३० वाजेच्या सुमारास लाचखोर तहसीलदार चव्हाणच्या छत्रपती संभाजीनगर येथील घराची झडती घेतली. यात या पथकाच्या हाती काय लागले याची माहिती मिळू शकली नाही.
राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्नलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेला पैठणचा तहसीलदार एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे. यातून याप्रकरणी एसीबीने कारवाई करून नये, यासाठी या विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे.
वाळू माझ्या घरी टाकयाच प्रकरणात आणखी एका लोकसेवक महसूल सहायक हरिष शिंदे ( रा. पैठण) यास देखील एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. जप्त वाहनातील वाळू शिंदे याने लाच म्हणून स्वतःच्या घरी टाकण्यास सांगितली होती.