बारदाना संपल्याने तूर खरेदीला ब्रेक
By Admin | Updated: June 9, 2017 23:40 IST2017-06-09T23:38:32+5:302017-06-09T23:40:09+5:30
हिंगोली :अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे.

बारदाना संपल्याने तूर खरेदीला ब्रेक
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री संघाच्या वतीने तूर खरेदी सुरु असून, २२ एप्रिलपर्यंत ६ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली असता ४ जूनपर्यंत १४ हजार ४८४ क्विंटल तूर खरेदी झाली. तर नव्यानेच एसएमएसद्वारे मागून घेतलेल्याही तुरीची खरेदी सुरु केली असता, अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे.
नाफेडने तूर खरेदीचे मैदान सोडून पळ काढल्यानंतर खरेदी विक्री संघातर्फे तूर खरेदी करणे सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथे ३० हजार क्विंटल तुरीची नोंदणी झालेली आहे. ६ जूनपासून नोंदणी केलेली तूर एसएमएसद्वारे बोलावण्यात येत आहे. काहींनी तर त्यापूर्वीच तूर आणून टाकली आहे. पहिल्याच दिवशी येथे १११७ क्विंटल, दुसऱ्या दिवशी ७ जूनला ११५८ आणि ८ जूनला ६३८ क्विंटल अशी एकूण २ हजार ९१३ क्विंटल तूर खरेदी केली आहे. शेतकरी मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनामुळे शेतकरी तूर विक्रीस घेऊन येत नाहीत. परंतु काही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच येथे विक्रीस तूर टाकली होती. आता एसमएसद्वारे ५० शेतकऱ्यांना तूर आणण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आता पर्यंत नोंदणी झालेल्या १०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणली आहे. मग हा प्रयोग नेमका किती दिवस यशस्वी होईल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच दोन दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे खरेदीसाठी अडचणीही येत आहेत. अशाही बिकट परिस्थितीत तूर विक्री होत असली तरी शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. खरेदीची माहिती नाफेडला कळविल्यानंतर ते खरेदी विक्री संघाच्या बँक खात्यावर टाकणार व नंतर शेतकऱ्यांना धनादेश दिला जाणार आहेत. पेरणी तोंडावर असून, पैसे मिळण्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या तूर विक्री केंद्रावर ३१ मे पर्यंत नोंदणी झालेल्या ५० - ५० शेतकऱ्यांना एसएमसद्वारे बोलावले जात असून, त्यांची कागदपत्रे महसूल विभागाकडून तपासून घेतली जात आहेत. त्यामुळे सध्यातरी येथे तूर खरेदी सुरळीत सुरु आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची टप्प्या टप्प्याने तूर खरेदी केली जाणार असल्याचे सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी सांगितले.