आता आगामी महिनाभर घरातच करावी लागणार दाढी-कटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 12:35 PM2021-04-07T12:35:58+5:302021-04-07T12:46:17+5:30

Break the chain Impact : शहरात ५ हजार दुकाने असून किमान १०,००० कारागीर त्यात काम करतात

Break the chain Impact : Beard-hair styling will now be done at home for the next month | आता आगामी महिनाभर घरातच करावी लागणार दाढी-कटिंग

आता आगामी महिनाभर घरातच करावी लागणार दाढी-कटिंग

googlenewsNext
ठळक मुद्दे केशकर्तनालय चालविणाऱ्यांना उदरनिर्वाहाची चिंताकुटुंबीयांचे होणार हाल, शासकीय मदतीचे कायदुकान आणि घरभाडे, शालेय शुल्क, बँकांचे हप्ते फेडणार कसे

- साहेबराव हिवराळे 
 

औरंगाबाद : कुटुंबीयांचा जगण्याचा मोठा प्रश्न पडला असताना गतवर्षीचा कर्जाचा डोंगर आताच कुठे कमी करण्याच्या प्रयत्नात असताना पुन्हा महिनाभर दुकान बंद करण्याच्या सूचना आल्याने अस्वस्थतता पसरली आहे. लॉकडाऊनमध्ये कायम केशकर्तनालयांनाच बंदी का, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात ५ हजारांच्या जवळपास केशकर्तनालये असून, एका दुकानात किमान दोन कारागीर काम करतात. त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब असा प्रपंच चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मुलांचे शिक्षण ऑनलाइन झाल्याने मुलांना मोबाइल द्यावा लागला. नुकताच कुठे व्यवसाय सुरू झाला आणि पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केल्याने दुकाने बंद करण्यात आली. तीही दुकाने फक्त शनिवार, रविवार नव्हे तर ३० दिवस बंद ठेेवण्यात येणार आहेत. शहरात ५ हजार दुकाने असून किमान १०,००० कारागीर त्यात काम करतात. कोरोना काय फक्त कटिंग करणाऱ्यांमुळेच वाढतोय का, सॅनिटायझर, मास्कचा वापर करून ग्राहकाची दाढी-कटिंग केली जात आहे. त्यावरसुद्धा मोजकेच ग्राहक दुकानात बोलावून त्यांची कटिंग केली जात असल्याने सध्या व्यवसाय व्यवस्थित सुरू होता; परंतु पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आणि ते केशकर्तनालयांच्या मुळावर आले आहे. आता महिनाभर घरातच दाढी-कटिंग करावी लागणार आहे, तर कारागिरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

शासनाने विचार करावा
लॉकडाऊनच्या नावाखाली गरीब कुटुंबीयांच्या जीवनाचा गाडाच थांबविला जात आहे. २४ तासांतून किमान ४ तास दुकान चालविण्याची परवानगी द्यावी, शासनाने याचा विचार करावा.
- नवनाथ घोडके, अ.भा. जिवा सेना, मराठवाडा अध्यक्ष

दुकानाचे भाडे भरावे कसे...
गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक दुकानदारांनी भाडे न दिल्याने दुकान खाली करावे लागले. महिनाभर दुकान बंद ठेवल्यानंतर दुकानाचे भाडे भरावे कसे, असा प्रश्न पडला आहे. याविषयी कुणीही बोलायला तयार नाही.
- बाळासाहेब वाघ, दुकान चालक

घरभाड्याचा प्रश्न पडतो
गत लॉकडाऊनमध्ये अनेक कुटुंबीयांनी गावाकडे जाणे पसंत केले, तर येथे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविताना उसनवारीशिवाय कारागिरांना पर्याय राहिलेला नाही. त्यात घरभाड्याचा मोठा प्रश्न पडला आहे.
- मुंजाभाऊ भाले, दुकान चालक

केशकर्तनालयास परवानगी द्यावी....
खेड्यात मुलांचे शिक्षण होत नसल्याने अनेक कुटुंबे शहरात वास्तव्यास आहेत. एका दुकानावर किमान दोन कारागीर पोट भरत असल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा मोठा प्रश्न पडतो. इतर दुकानांना परवानगी दिली, मग केशकर्तनालयास का देत नाही, असा प्रश्न आहे.
- सुरेश बोर्डे, दुकान चालक
 

Web Title: Break the chain Impact : Beard-hair styling will now be done at home for the next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.