शिऊर/ वैजापूर : चालकाने ब्रेक दाबताच ट्रकमधील सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग अंगावर पडून झाेपलेल्या मध्यप्रदेशातील चार गरीब मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील एका ढाब्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजता घडली. दिवाण मानसिंग गरासिया(वय २४), विजय कंवरलाल गरासिया(वय २१), निर्मल राजुजी गरासिया(वय २१), विक्रम मदनजी कछावा(वय २१, सर्व रा. खडावदा, ता. मनात, जि.नीमच, मध्यप्रदेश) अशी मयतांची नावे आहेत.
सोमवारी मध्यप्रदेशातील खाट विकणारे पाच मजूर हे कर्नाटक येथून मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी अवजड लोखंडी प्लेटची वाहतूक करण्याऱ्या ट्रक(आरजे ०९ जीडी ३८५३) ने जात होते. काम करून थकल्यामुळे सर्व मजूर ट्रकमध्ये गाढ झाेपले होते. छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील एका ढाब्याजवळ रात्री ११ वाजता चालकाने स्पीड ब्रेकर आल्याने अचानक ट्रकचे ब्रेक जोरात दाबले. यामुळे सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग झोपलेल्या मजुरांच्या अंगावर पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका प्लेटचे वजन २० ते २२ किलो होते. अपघात घडताच वाहन जागेवर सोडून चालक फरार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनि. वैभव रणखांब, पोउनि.चेतन ओगले, गणेश गोरक्ष, सुभाष ठाेके यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोकलेनच्या सहाय्याने मजुरांचे मृतदेह वाहनातून बाहेर काढण्यात आले. शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मजुरांचे मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात ट्रक चालक सुरेश गुर्जर(रा. भिलवाडा, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
केबीनमध्ये थांबला म्हणून वाचलाट्रकमधून प्रवास करणारे पाच मजूर हे झोपण्यासाठी केबीनमधून पाठीमागे झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा ट्रकचालकाने एकाला केबीनमध्ये सोबत थांबण्याची विनंती केली. तसेच झोपण्यासाठीही जागा असल्याचे सांगितले, त्यामुळे अनिल गरासिया हा तेथेच थांबला यामुळे त्याचे प्राण वाचले.
पोटाची खळगी भरण्यासाठी गेले होते कर्नाटकातमयत चार जण हे गरीब कुटुंबातील असून ते खाट विणण्याचा व्यवसाय करुन पोटाची खळगी भरतात. आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी हे पाच जण मध्यप्रदेशाकडे निघाले होते. मात्र वाटेतच त्यातील चार जणांना काळाने हिरावून नेले.