वसमत शहरात विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला
By Admin | Updated: June 19, 2016 23:20 IST2016-06-19T23:17:46+5:302016-06-19T23:20:49+5:30
वसमत : एका घरातून दुसऱ्या घरात वीजजोडणी दिलेल्या वायरमुळे पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्याला बांधलेल्या तारेला गल्लीतील नऊ वर्षीय मुलाने स्पर्श केल्याने विजेचा धक्का लागून तो ठार झाला.

वसमत शहरात विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला
वसमत : एका घरातून दुसऱ्या घरात वीजजोडणी दिलेल्या वायरमुळे पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्याला बांधलेल्या तारेला गल्लीतील नऊ वर्षीय मुलाने स्पर्श केल्याने विजेचा धक्का लागून तो ठार झाला. वसमत येथील बुधवारपेठेत ही घटना रविवारी दुपारी घडली. मयताच्या पालकांनी सदर इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वसमत पोलिस ठाण्यात ठाण मांडले होते. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसमत शहरातील बुधवारपेठ भागातील एकनाथ लक्ष्मण बोद्दलवार हा नऊ वर्षीय मुलगा खेळत असताना गल्लीतील एका घरावर बांधलेल्या लोखंडी ताराला त्याचा स्पर्श झाला. या तारेत वीज प्रवाह उतरलेला असल्याने स्पर्श होताच तो जागीच ठार झाला. रस्त्याच्या दुसऱ्या कडेला असलेल्या एका घरातून रस्ता ओलांडून दुसऱ्या घरात वायरद्वारे वीजपुरवठा करण्यात आलेला आहे. ही वायर कट झाल्याने पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्यावर ओझे ठेवण्यासाठी बांधलेल्या दगडाच्या तारांत वीजप्रवाह उतरला व ही घटना घडल्याची मयत मुलाच्या पालकांची तक्रार आहे.
धोकादायक पद्धतीने वीजपुरवठा करुन मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयत मुलाचे पालक व नातेवाईक वसमत पोलिस ठाण्यात जमा झाले होते. मुलाच्या आईच्या आक्रोशाने पोलिस ठाणे दणाणून गेले होते. याप्रकरणी श्याम बोद्दलवार यांच्या तक्रारीवरुन मुलाच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी मिर्झा जबीउल्ला बेग, इमरान मिर्झा बेग, सरफराज मिर्झा बेग, इरफान बेग (सर्व रा.बुधवारपेठ, वसमत) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास फौजदार वर्षा डहाळे, के. बी. चव्हाण आदी करीत आहेत. (वार्ताहर)