मुलगा, मुलीपाठोपाठ पित्याचाही मृत्यू
By Admin | Updated: March 22, 2016 01:34 IST2016-03-22T01:07:19+5:302016-03-22T01:34:56+5:30
बाजार सावंगी : बोडखा (ता. खुलताबाद) येथे घरी केलेल्या खिचडीतून झालेल्या विषबाधेने मुलगा, मुलीपाठोपाठ पित्याचीही सोमवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात उपचार

मुलगा, मुलीपाठोपाठ पित्याचाही मृत्यू
बाजार सावंगी : बोडखा (ता. खुलताबाद) येथे घरी केलेल्या खिचडीतून झालेल्या विषबाधेने मुलगा, मुलीपाठोपाठ पित्याचीही सोमवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. या अनाकलनीय घटनेमुळे बोडखा परिसरात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण महादू जेठे (४२ ) हे पत्नी, तीन मुली, मुलगा या परिवारासह बोडखा येथे राहतात. एक आठवड्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी घरात खिचडी खाल्ली होती. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच लक्ष्मण जेठे यांचा एकुलता एक मुलगा यश जेठे यास जुलाब व वांत्याचा त्रास वाढत गेला. यामुळे यशला औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरूअसताना त्याचा १२ मार्च रोजी मृत्यू झाला होता.
बहिणीनंतर पित्याचाही मृत्यू
यशची बहीण राणी लक्ष्मण जेठे (१६) हिलासुद्धा जुलाब व वांत्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिला उपचारासाठी १९ मार्च रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २० मार्च रोजी तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. नेमका काय प्रकार घडला, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून, अफवांना ऊत आला आहे. राणीवर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
खिचडी खाल्ल्याने लक्ष्मण जेठे यांची प्रकृती तब्बल तीन दिवसांनंतर खालावली होती.
घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर यांनी दिली. 1
घरात बनवलेली खिचडी फक्त तिघांनीच खाल्ली की सर्वांनी खाल्ली. सर्वांनी खाल्ली असल्यास फक्त तिघांनाच विषबाधा कशी झाली, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. सोमवारी राणीचे शवविच्छेदन करण्यात आले असल्याने या प्रश्नाची उत्तरे मिळतील.