दोन्ही पंडित एकत्र येऊनही तालुक्यात भाजपलाच मताधिक्य
By Admin | Updated: May 18, 2014 00:47 IST2014-05-18T00:30:20+5:302014-05-18T00:47:00+5:30
सखाराम शिंदे , गेवराई गेवराई मतदारसंघात लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही पंडितांची मोट बांधण्यात पवारांना वरकरणी यश आले असले तरी तालुक्यात दोन्ही पंडितांचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले आहेत.

दोन्ही पंडित एकत्र येऊनही तालुक्यात भाजपलाच मताधिक्य
सखाराम शिंदे , गेवराई गेवराई मतदारसंघात लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही पंडितांची मोट बांधण्यात पवारांना वरकरणी यश आले असले तरी तालुक्यात दोन्ही पंडितांचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले आहेत. या मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्य मिळाले आहे. यामुळे तालुक्यात अॅड. लक्ष्मण पवार यांनी केलेल्या कामाची चर्चाही नागरिकांमधून होत आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात आ. बदामराव पंडित व आ. अमरसिंह पंडित यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य अवघ्या महाराष्टÑालाच माहित आहे. हे दोघे नात्याने काका-पुतणे असले तरी राजकारणाच्या आखाड्यात एकदुसर्याला ‘चित-पट’ करण्यातच त्यांनी आपले राजकीय कसब वापरले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आ. बदामराव पंडित व अमरसिंह पंडित हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षात होते. त्यामुळे या दोघांच्याही कार्यकर्त्यात कमालीचे वितुष्ठ आहे. दोघांची मनमिळवणी करण्यात राष्टÑवादीच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले असले, तरी स्थानिक पातळीवर तालुक्यात दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते कोठेच सोबत आल्याचे दिसून आले नाही. दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांत अशी ‘बेकी’ तर भाजपला अॅड. लक्ष्मण पवार यांच्यासारखा मिळालेला तरुण चेहरा यामुळे भाजपच्या यशाचा मार्ग सुकर झाला. तसे पाहिले तर या निवडणुकीत अॅड. लक्ष्मण पवार यांनीही रात्रंदिवस एक करीत प्रचाराची राळ उठवून दिली. त्यांच्यासाठी ही खरी ‘अग्निपरीक्षा’च होती. यात ते उत्तीर्ण झाल्याचे दिसून येत आहे. गेवराई येथे दोन्ही पंडितांना एका ‘म्यानात’ आणण्यात राष्टÑवादी यशस्वी झाली. मात्र, हे जोडी मतदारांना भावली नाही. मतदारांनीच त्यांना नाकारल्याचे दिसून आले. तसे पाहिले तर लोकसभेचा शंखनाद झाला की, गेवराईमध्ये काय होणार? दोन्ही पंडित एक येतील का? याची चर्चा सुरू झाली होती. तर एकीकडे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोघांना एकत्र राहण्याचे आदेशही दिले होते. यानंतर दोन्ही आमदार अनेक ठिकाणी एकाच मंचावर ‘मांडीला मांडी’ लावून बसल्याचे दिसून आले. पक्षश्रेष्ठींपुढे त्यांना दोघे एकत्र दिसून आले, मात्र गेल्या वीस वर्षांपासून दुभंगलेली मने एकत्र आली का? एकमेकांना पाण्यात पाहणार्यांचे खरोखरच मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्न आहे. राष्टÑवादीच्या प्रचाराचा नारळही गेवराईत फोडण्यात आला. येथे दोन्ही पंडितांनी शड्डू ठोकले, मात्र याचा उपयोग काही झाला नाही. कारण गेवराई मतदारसंघात दोन्ही पंडितांचे कार्यकर्ते कधीच एकत्र आले नाहीत ना त्यांनी प्रचार एकत्र केला. दोन्ही आमदारांच्या कॉर्नर बैठका, सभा, मतदारांच्या गाठीभेटी, रॅली सर्वच स्वतंत्र होत असल्याने मतदारांमध्ये याचा वेगळाच संदेश गेला. यामुळे गेवराई मतदासंघात राष्टÑवादी दिसायला तगडी वाटत असली तरी काम काही झालेच नाही. तालुक्यात ८ जि.प. सदस्य, १६ पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह बहुसंख्य ग्रामपंचायत राष्टÑवादीच्या ताब्यात आहेत. असे असतानाही जेथे राष्टÑवादीचे पदाधिकारी आहेत तेथेही राष्टÑवादीला मताधिक्य मिळू शकले नाही. राष्टÑवादीची ही पिछेहाट आत्मपरिक्षण करावयास भाग पाडणारी आहे. सुरेश धस,बदामराव पंडित, अमरसिंह पंडित यांनी गाव, वाडी, वस्ती पिंजून काढले यामुळे मताधिक्याचा विश्वास होता, मात्र फासे उलटेच पडले. मतदारसंघात भाजपची धुरा अॅड.लक्ष्मण पवार यांच्याकडे होती. वास्तविक त्यांच्याकडे यंत्रणाही तोकडी आहे व कार्यकर्त्यांची फळीही फारशी नाही. याउपरही त्यांनी गाव-वाडी वस्तीवर जाऊन मतदारांना साद घातली. याला गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा व मोदी लाटेचाही फायदा झाला. यामुळे येथून तब्बल ३१ हजारांची लीड मिळाली. यामुळे तालुक्यात आता अॅड. पवार यांच्या कामाची चर्चा सुरू आहे.