दोन्ही काँग्रेसला धसका..!

By Admin | Updated: May 18, 2014 00:49 IST2014-05-18T00:28:41+5:302014-05-18T00:49:07+5:30

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद खुद्द महायुतीलाही सव्वादोन लाखांहून अधिक मताधिक्य मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

Both the Congress party ..! | दोन्ही काँग्रेसला धसका..!

दोन्ही काँग्रेसला धसका..!

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद खुद्द महायुतीलाही सव्वादोन लाखांहून अधिक मताधिक्य मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, ही किमया मोदी फॅक्टरने घडवून आणली. मतदारसंघातील सर्वच विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला भरीव मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार, याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे धाबे दणाणले असून, आगामी तीन महिन्यांत काय उलटफेर होतात, यावरच विधानसभेचे गणित अवलंबून राहणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी आणि परंडा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहाही मतदारसंघात महायुतीला आघाडी मिळाली असली तरी बार्शी आणि औसा या मतदारसंघातील आघाडी पन्नास हजारांपेक्षा अधिक आहे. काहीशी अशीच स्थिती तुळजापूर आणि उमरगा मतदारसंघातही दिसून येते. विधानसभा निवडणुकीचा फड आता रंगणार आहे. या निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. या परिणामांची तीव्रता काय असेल, या विचाराने सत्ताधारी आमदारांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे. मोदीच्या त्सुनामी लाटेत राष्टÑवादीचे गडही उद्ध्वस्त झाले असले तरी उस्मानाबाद आणि परंडा या मतदारसंघातील मताधिक्य इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी आहे. ही काहिशी राष्टÑवादीसाठी दिलासा देणारी बाब असली तरी मिळणार्‍या अत्यल्प कालावधीत पुन्हा बस्तान बसविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसला एकूणच कार्यपध्दतीत अमुलाग्र बदल करावे लागणार आहेत. दुसरीकडे तुळजापूर मतदारसंघात पालकमंत्री चव्हाण यांनी मोठी विकासकामे केली असली तरी सुमारे ३४ हजारांची लिड तोडण्याचे त्यांच्यापुढेही आव्हान राहणार आहे. अशा परिस्थितीत हाबकून गेलेल्या दोन्ही काँग्रेस काय रणनीति आखतात, हे पहावे लागणार आहे. गाफिलपणा भोवला लोकसभा निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणेच चुरशीची होईल, असा दोन्ही काँग्रेसबरोबर महायुतीचाही कयास होता. त्यामुळेच मतमोजणी सुरू होईपर्यंत आघाडीकडून विजयाची शक्यता वर्तविली जात होती. महायुतीलाही एवढ्या मताधिक्याची अपेक्षा नव्हती. मात्र, निकालाने सर्वांचेच अंदाज चुकविले. संभाव्य लाटेपासून गाफिल राहिल्याने राष्टÑवादीनेही एकत्रितपणे ही निवडणूक लढल्याचे दिसले नाही. विशेषत: राष्टÑवादीचा जोर असलेल्या असलेल्या परंडा, कळंब यासह इतर प्रमुख शहरांत किरकोळ अपवाद वगळता राष्टÑवादीच्या नेत्यांची मोठी सभा झाली नाही. हा गाफिलपणाही आघाडीला भोवला. कार्यकर्त्यांतील मतभेद भोवले काँग्रेस आणि राष्टÑवादी या आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये समन्वय नव्हता. जिल्हा परिषदेसह जिल्हा बँकेत काँग्रेस, सेना अशा आघाडीने हे संबंध अधिकच बिघडविले. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्ह्यातील अनेक गावांत हे दोन प्रमुख पक्षच आमने-सामने उभे ठाकले. त्यामुळे कार्यकर्त्यांतील मतभेदही विकोपाला गेले होते. निवडणुकीच्या तोंडावर आघाडीत मतैक्य घडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, काँग्रेसच्या काही जबाबदार पदाधिकार्‍यांनीही ऐनवेळी दगाफटका केल्याने महायुतीचे पारडे जड झाले. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेस कशा पध्दतीने सामोरे जातात, हे पहावे लागणार आहे.

Web Title: Both the Congress party ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.