दाम्पत्याचा विहिरीत मृतदेह आढळला
By Admin | Updated: January 30, 2017 00:04 IST2017-01-30T00:02:34+5:302017-01-30T00:04:59+5:30
तळणी येथील शेतकरी नामदेव गणपत हनवते (७६) व जनाबाई नामदेव हनवते (६८) यांचे मृतदेह आईच्या तलावाजवळील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले.

दाम्पत्याचा विहिरीत मृतदेह आढळला
तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत जोपर्यंत पोलीस अधीक्षक येणार नाही, तोपर्यत मृतदेह बाहेर काढणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तळणी येथील शेतकरी नामदेव गणपत हनवते (७६) व जनाबाई नामदेव हनवते (६८) यांचे मृतदेह आईच्या तलावाजवळील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. सदर प्रकरण शेतीच्या वादातून झाले असल्याचा आरोप वृद्ध दाम्पत्याच्या नातेवाईकांनी करून आक्रोश केला. याप्रकरणी जोपर्यंत पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह घटनास्थळी येऊन आमची कैफीयत ऐकणार नाही, तोपर्यंत दोघांचे मृतदेह जागेवरून हलवू देणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी भेट दिली. हे प्रकरण शेतीच्या वादावरुन घडल्याचा आरोप करीत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी भेट देऊन नातेवाईकांची समजूत काढली. त्यांच्या आश्वासन दिल्यानंतर विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आले.