मालमत्तेसाठी केला महिलेचा खून
By Admin | Updated: August 22, 2014 00:59 IST2014-08-22T00:40:00+5:302014-08-22T00:59:15+5:30
वाढवणा बु़ : माहेरच्या जमिनीचा दावा कोर्टात सुरु असताना त्यावरुन झालेल्या वादातून एका ५० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना बुधवारी घडली़ याप्रकरणी प्रारंभी वाढवणा पोलिसांत

मालमत्तेसाठी केला महिलेचा खून
वाढवणा बु़ : माहेरच्या जमिनीचा दावा कोर्टात सुरु असताना त्यावरुन झालेल्या वादातून एका ५० वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना बुधवारी घडली़ याप्रकरणी प्रारंभी वाढवणा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ मात्र रात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास मयताच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
उदगीर तालुक्यातील अनुपवाडी येथील महादाबाई एकनाथ सूरनर (वय ५०) यांचे माहेर चाकूर तालुक्यातील ब्रम्हवाडी आहे़ त्यांच्या वडिलांना दोन पत्नी होत्या़ त्यांना २४ एकर जमीन होती़ महादाबार्इंच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जमिनीवर वारसा हक्काप्रमाणे ७ जणांची नावे लावण्यात आली आहेत़ कालांतराने या जमिनीबाबत वाद सुरु झाला़ हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले़ त्याची सुनावणी २१ आॅगस्ट रोजी असतानाच निकाल विरोधात जाण्याच्या भितीने सुग्रीव कांबळे, मोहन कांबळे, धनाजी कांबळे व अन्य तिघांनी मिळून कट रचला़
२० आॅगस्ट रोजी आरोपींनी महादाबाई व त्यांचे पती एकनाथ सूरनर यांना पोस्टमास्तर बोलत असल्याची बतावणी करुन वाढवण्यात येण्यास सांगितले़ त्यानुसार हे दाम्पत्य अनुपवाडी येथून वाढवणा पाटीवर आले़ येथून एकनाथ सूरनर हे पोस्टमास्तर आले का, हे पाहण्यासाठी वाढवण्यात गेले़ याचदरम्यान, आरोपींनी महादाबार्इंना पळवून नेऊन अनुपवाडी ते वाढवणा पाटीदरम्यान खून केला, अशी तक्रार मयत महिलेचे पती एकनाथ सूरनर यांनी केली आहे़ त्यानुसार रात्री उशिरा ६ जणांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़