रक्त दुपटीने महागले

By Admin | Updated: June 20, 2014 01:14 IST2014-06-20T01:08:17+5:302014-06-20T01:14:58+5:30

बापू सोळुंके , औरंगाबाद शासकीय रक्तपेढ्यातील होल ब्लड पिशवीचा दर दुपटीहून अधिक तर खाजगी ब्लड बँकांमध्ये ८५० रुपयांऐवजी १४५० रुपये झाला आहे.

Blood multiplied twice | रक्त दुपटीने महागले

रक्त दुपटीने महागले

बापू सोळुंके , औरंगाबाद
रक्त आणि रक्तघटकाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केल्यामुळे शासकीय रक्तपेढ्यातील होल ब्लड पिशवीचा दर दुपटीहून अधिक तर खाजगी ब्लड बँकांमध्ये ८५० रुपयांऐवजी १४५० रुपये झाला आहे.
रक्तपुरवठा करण्यापूर्वी रक्ताच्या विविध चाचण्या कराव्या लागतात. ते साठवून ठेवणे, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञ, यंत्रसामग्री आणि डॉक्टर्स या सगळ्या खर्चाचा विचार करता रक्ताचे दर परवडत नव्हते. रक्त आणि रक्तघटकाचे दर वाढविण्यात यावेत, अशा मागणीची याचिका दी फेडरेशन आॅफ नागपूर ब्लड बँकेने उच्च न्यायालयात केली होती. कोर्टाच्या निर्देशानुसार शासनाने १६ सदस्यीय समिती स्थापन करून शुल्क निश्चितीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. समितीच्या शिफारशीनुसार सुधारित सेवा शुल्काचा प्रस्ताव राज्य रक्तसंक्रमण परिषदेतर्फे राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेकडे पाठविण्यात आला होता. राष्ट्रीय परिषदेने त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील रक्त, रक्तघटकाचे दर वाढविण्याचा निर्णय १८ जून रोजी घेतला. शासकीय रक्तपेढ्यातील दर दुपटीहून अधिक तर खाजगी रक्तपेढ्यांमधून आता होल ब्लड पिशवी ८५० रुपयांऐवजी १४५० रुपयांना मिळेल.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार केवळ एक टक्का रक्तदातेच सर्व रुग्णांच्या रक्ताची गरज भागवू शकतात.
मात्र, त्याप्रमाणात रक्तदान होत नाही. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी आहे. त्यानुसार १२ लाख रक्तदाते असणे गरजेचे आहे. विभागीय शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत लहान-मोठे एक हजारांहून अधिक खाजगी रुग्णालये आहेत.
मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील रुग्ण शहरात उपचारासाठी येतात. त्यामुळे येथील रक्ताची मागणीही अधिक आहे. येथे दरवर्षी साधारणपणे ४० ते ५० हजार रक्त बॅग संकलन होते.
यांना मिळणार मोफत रक्त
थॅलेसिमिया आजाराचे रुग्ण
हिमोफेलियाचे रुग्ण
सिकलसेल अ‍ॅनेमिया आजाराचे रुग्ण
ज्या आजारात रुग्णास जिवंत राहण्यासाठी वारंवार रक्त द्यावे लागते, अशा सर्व रुग्णांना मोफत रक्त द्यावे, असा शासन नियम आहे. त्यानुसार अशा रुग्णांना मोफत रक्त देण्याची जबाबदारी संबंधित रक्तपेढीची आहे.

Web Title: Blood multiplied twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.