धुंवाधार पावसाने बंधारे‘ओव्हर फ्लो’

By Admin | Updated: September 2, 2014 01:52 IST2014-09-02T00:10:56+5:302014-09-02T01:52:47+5:30

शिरूरकासार : गेल्या दहा दिवसांपासून शिरुरकासार तालुक्यात धुंवॉधार पाऊस होत असल्याने शहराजवळ असलेला सिद्धेश्वर बंधारा पूर्णपणे भरला आहे

Bleached 'Over Flow' by Blizzard | धुंवाधार पावसाने बंधारे‘ओव्हर फ्लो’

धुंवाधार पावसाने बंधारे‘ओव्हर फ्लो’


शिरूरकासार : गेल्या दहा दिवसांपासून शिरुरकासार तालुक्यात धुंवॉधार पाऊस होत असल्याने शहराजवळ असलेला सिद्धेश्वर बंधारा पूर्णपणे भरला आहे तर शहराला अर्धप्रदक्षिणा घालणारी सिंदफणा दुथडी भरून वाहू लागली आहे. हे चित्र पाहूृन शिरूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात कोणत्या ठिकाणी पाऊस पडला नव्हता. त्यानंतर ७ जुलैपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली होती. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी धरणे कोरडीठाक अशी परिस्थिती पहावयास मिळाली होती. मात्र गेल्या दहा दिवसांपासून वरूणराजा प्रसन्न झाला असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
या पावसामुळे पुढे बंधारे भरभरून वाहू लागले आहेत. दरम्यान, शुक्रवारी गणपती स्थापन झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झाली आणि सिद्धेश्वर बंधारा व सिंदफणा नदी दुथडी भरून वाहू लागले. गेल्या अनेक महिन्यांपासून शिरुरकर पावसाची वाट पाहत होते. त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सिंदफणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हे पाहण्यासाठी गर्दी केलीहोती.
या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे आगामी काळात पिकांना देण्यासाठी मुबलक पाणीसाठा झाला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी शिरूरकासार परिसरात दुष्काळ पडला होता. त्यावेळी जैन संघटना व लोकसहभागातून तालुक्यातील तलावातील गाळ काढण्यात आला होता. त्याचा लाभ शिरूरवासीयांना आता होत आहे. गाळ काढल्यामुळे साठवण क्षमता वाढली आहे.
पाऊस दिवसभर चालू असल्यामुळे शेती कामे पूर्णत: बंद पडली आहेत. अनेक गावात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झालेला आहे. रस्ते दुरूस्त करण्यात आलेले नसल्यामुळे ही समस्या ओढावली असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून पाऊस चांगला पडत असल्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाऊस पडत नसल्यामुळे शासनाने बीड, वडवणी व अंबाजोगाई तालुके वगळता जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे ही घोषणा केल्यानंतर काही दिवसांत पावसाला सुरुवात झाली आहे. शिरूर तालुका व परिसरात मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा पाऊस होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात ग्रामस्थांना पहावयास मिळाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Bleached 'Over Flow' by Blizzard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.