अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेस ब्लॅकमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 06:22 PM2020-11-03T18:22:45+5:302020-11-03T18:25:48+5:30
पैशासाठी महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : पतीपासून विभक्त महिलेला आयुष्यभर सोबत राहाण्याचा विश्वास दाखवत मागील चार वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर गेल्या महिन्यात तिच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच त्या भामट्याने तिचे काढलेले अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सदरील महिलेने सिडको ठाण्यात दोघाजणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी लैंगिकशोषण व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अशोक विधाते (रा. राजेंद्रनगर, नारेगाव) व त्याचा मित्र सय्यद शकील (रा. मिसारवाडी), अशी आरोपींची नावे आहेत. एक ३० वर्षीय महिला गेली १० वर्षे घरगुती भांडणामुळे पतीपासून विभक्त राहत आहे. चार वर्षांपासून ती आपल्या दोन मुलांसोबत राजेंद्रनगर, नारेगाव येथे राहते. नारेगाव येथे तिचे कपडे विक्रीचे दुकान आहे. नेहमी कपडे खरेदीसाठी येणाऱ्या अशोक विधाते याच्यासोबत तिची ओळख झाली. अशोकने २४ एप्रिल २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास फोन करून महिलेला टी.व्ही. सेंटर येथे बोलावून घेतले व तिला किरायाने घेतलेल्या विवेकानंदनगर, हडको येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी नेले. तुझ्यावर माझे प्रेम आहे. आयुष्यभर सोबत राहू, अशी थाप देऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्याने त्याच घरात सदरील महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचे लैंगिक शोषण केले.
गेल्या महिन्यात २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अशोकने तिला फोन करून त्याच घरी बोलावून घेतले. तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला व मला ५ लाख रुपयांची गरज आहे. तू कोठूनही पैसे घेऊन ये, असे अशोक म्हणाला. तेव्हा सदरील महिलेने पैसे आणण्यास असमर्थता दर्शविली. पैसे देण्यास नकार देताच अशोकने तिचे काढलेले अश्लील व्हिडिओ दाखवत ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता त्या महिलेला अशोक व त्याचा मित्र सय्यद शकील हे दोघ जण नारेगाव परिसरातील हॉटेल शाहीनजवळ
भेटले. तेव्हा शकीलने धमकी दिली की, अशोकने जरी ते व्हिडिओ डिलीट केले, तरी ते माझ्या मोबाईलमध्ये असून, मी ते सर्वांना दाखवू शकतो. घाबरलेल्या या महिलेने हा प्रकार आई व भावाला सांगितला. त्यानंतर सिडको ठाणे गाठून दोघा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ हे याप्रकरणी तपास करीत आहेत.