कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करा

By Admin | Updated: June 11, 2016 00:17 IST2016-06-10T23:54:29+5:302016-06-11T00:17:04+5:30

औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची सर्व कामे संपली पाहिजेत, असा आदेश पदाधिकारी व आयुक्तांनी दिला होता. प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाला तरी अनेक रस्त्यांची कामे अर्धवट पडली आहेत.

Blacklist the contractors | कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करा

कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करा

औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची सर्व कामे संपली पाहिजेत, असा आदेश पदाधिकारी व आयुक्तांनी दिला होता. प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाला तरी अनेक रस्त्यांची कामे अर्धवट पडली आहेत. संथ गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून त्वरित काम करून घेण्यात यावे. दोन वर्षांपूर्वी वर्क आॅर्डर घेऊनही रस्त्याचे काम सुरू न केलेल्या कंत्राटदारांना दोन वर्षांसाठी ब्लॅक लिस्ट करावे, अशा सूचना शुक्रवारी महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केली.
शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांची आकडेवारी नमूद केली. मागील ३ वर्षांमध्ये २५६ कामे प्रलंबित आहेत. काम करण्याची इच्छा नसलेल्या कंत्राटदारांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. कारवाई केल्यानंतर कमी कालावधीत निविदा काढाव्यात.
मागील वर्षी ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली त्यांना त्वरित बिले द्यावीत. बिले देताना रोटेशन पद्धत लावावी, असेही तुपे यांनी नमूद केले. रोशनगेट ते आझाद चौक या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. मंगळवारपासून या भागात पॅचवर्क करण्याचे जाहीर करण्यात आले. आढावा बैठकीस शहरातील डांबरी रस्त्यांची कामे करणारे आणि व्हाईट टॅपिंगचे कंत्राटदार उपस्थित
होते.
पाऊस सुरू होण्यापूर्वी शहरात पॅचवर्क व डांबरीकरणाची कामे संपविण्यात यावीत, असे सांगण्यात आले. कंत्राटदारांना दिलेले काम पूर्ण होईपर्यंत दुसरे काम देण्यात येऊ नये. यासाठी धोरण निश्चित करण्यात येईल. रमजान सुरू असल्याने कंत्राटदारांची देयके त्वरित द्यावीत, असेही यावेळी सांगितले.
बैठकीस उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, नासेर सिद्दीकी, राजू वैद्य, भाऊसाहेब जगताप, गजानन बारवाल, दिलीप थोरात, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार आदींची उपस्थिती होती.
कोल्हे-सिकंदर अली यांना झापले
बैठक सुरू असताना कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली नेहमीप्रमाणे फोनवर बोलत होते. महापौर तुपे यांनी त्यांना फोन महत्त्वाचा आहे की बैठक, अशी विचारणा केली. काही वेळेनंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे खुलासा देत होते. महापौरांचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे वाक्य सुरू होत होते. या मुद्यावरही महापौरांनी कोल्हे यांना राजशिष्टाचाराची (प्रोटोकॉल) आठवण करून दिली.

Web Title: Blacklist the contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.