सत्ता,संपत्तीच्या जोरावर भाजपचा विजय, त्यामुळे त्यांचा जुना कार्यकर्ता नाराज: अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:36 IST2025-12-22T17:35:30+5:302025-12-22T17:36:59+5:30
"भ्रष्टाचार हाच भाजपचा आत्मा!" अंबादास दानवेंची बोचरी टीका

सत्ता,संपत्तीच्या जोरावर भाजपचा विजय, त्यामुळे त्यांचा जुना कार्यकर्ता नाराज: अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: "भारतीय जनता पक्ष आता केवळ सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर निवडणुका लढवत आहे. या प्रक्रियेत ज्यांनी रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, तो मूळ जुना कार्यकर्ता आज स्वतःच्याच पक्षात असुरक्षित आणि नाराज आहे," असा घणाघाती आरोप शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि शिवसेनेच्या आगामी वाटचालीवर सविस्तर भाष्य केले.
नितीन गडकरींचा उल्लेख आणि भाजपवर प्रहार
दानवे म्हणाले की, नितीन गडकरींसारखे ज्येष्ठ नेते तत्त्वज्ञानाची भाषा करतात, मात्र पक्षात त्यांचे कोणीही ऐकत नाही. सध्याच्या भाजपमध्ये भ्रष्टाचार हाच पक्षाचा आत्मा झाला असून, मते विकत घेण्याची संस्कृती रूढ झाली आहे. मात्र, जनता या 'वांझोट्या' सभांना आणि पैशांच्या राजकारणाला कंटाळली असून लवकरच सत्याचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे मैदानात, वंचितसोबत युतीचे संकेत
शिवसेनेचा अधिकृत प्रचार २६ तारखेपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत जागावाटपाची अंतिम बोलणी सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. नगरपालिका निकालांचा परिणाम महानगरपालिका निवडणुकीवर होणार नाही, कारण महानगरपालिकेचे मतदार आणि तिथली समीकरणे पूर्णपणे वेगळी असतात, असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.