भाजपाची वेगळ्या चुलीची तयारी
By Admin | Updated: December 27, 2014 00:47 IST2014-12-27T00:45:40+5:302014-12-27T00:47:03+5:30
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत भाजपा वेगळी चूल मांडण्याच्या तयारीला झपाट्याने लागली आहे.

भाजपाची वेगळ्या चुलीची तयारी
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत भाजपा वेगळी चूल मांडण्याच्या तयारीला झपाट्याने लागली आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणात शिवसेनेची कोंडी करण्याची कुठलीही संधी भाजपा सोडत नाही. मागील दोन सभांमध्ये भाजपाने शिवसेनेशी फारकत घेतल्याप्रमाणे व्यवहार केल्यामुळे मनपा निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समांतर जलवाहिनी, पाणीपुरवठा, रखडलेले रस्ते, दिल्ली दौऱ्याची उदाहरणे पाहता भाजपाने आता स्वतंंत्र मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
सत्तेत असताना महापौरांच्या विरोधात बोलून सेनेने शहराचे वाटोळे केल्याचा संदेश देण्यासाठी भाजपा सरसावली आहे.
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला भाजपाने दोन आठवड्यांपासून विरोध सुरू केला आहे. विशेषत: सेनेसोबत सत्तेत असल्याने भाजपाने विरोध करून वेगळी राजकीय चूल मांडल्याचे दाखवून दिले. भाजपाचे मनपात १५ नगरसेवक आहेत. त्यात ४ शिवसेनेच्या नगरसेवकांची भर पडली आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत.
भाजपाच्या शिष्टमंडळाला केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना नीट भेटताही आले नसल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले आहे.
नायडू यांच्यासोबतचे छायाचित्र भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळवा, अशा सूचनाही सेनेच्या गोटातून काही पत्रकारांना केल्या जात होत्या. भाजपा पदाधिकारी केंद्रातून निधी आणण्याच्या नावाखाली गेले खरे मात्र, ते रिकाम्या हातानेच परतले आहेत.
पुढच्या दोन-तीन महिन्यांत निधी मिळणार असल्याचा दावा उपमहापौर संजय जोशी यांनी केला. केंद्रीय नगरविकासमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची भेट घेतल्याचे गटनेते संजय केणेकर यांनी सांगितले.