भाजपाचा शुक्रवारी शहरात शेतकरी मोर्चा
By Admin | Updated: August 21, 2014 00:11 IST2014-08-21T00:07:49+5:302014-08-21T00:11:23+5:30
औरंगाबाद : मागण्यांसाठी भाजपातर्फे शुक्रवारी (दि.२२) मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आ. पंकजा मुंडे यांनी दिली.

भाजपाचा शुक्रवारी शहरात शेतकरी मोर्चा
औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्ज माफी, वीज बिल माफी द्या, जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करा, आदी मागण्यांसाठी भाजपातर्फे शुक्रवारी (दि.२२) मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य आ. पंकजा मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ. मुंडे म्हणाल्या, सरकारने मराठवाड्यात टंचाईसदृश स्थिती जाहीर केली आहे; परंतु त्याचे परिपत्रकही अद्याप काढलेले नाही. मुळात आता कितीही पाऊस आला तरी पिण्याचे पाणी उपलब्ध होईल; परंतु हातची गेलेली पिके येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान व्हायचे ते झाले आहे. त्यामुळे सरकारने आता दुष्काळच जाहीर केला पाहिजे. या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रांतीचौकातून विभागीय कार्यालयावर जाणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस करणार आहेत. मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर संजय जोशी, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष बापू घडामोडे, डॉ. भागवत कराड, संजय केणेकर आदींची उपस्थिती होती.