महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न
By Admin | Updated: October 8, 2014 00:48 IST2014-10-08T00:30:06+5:302014-10-08T00:48:59+5:30
तीर्थपुरी : विदर्भ वेगळा करून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तर महाराष्ट्र विकण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना तुम्ही निवडून देणार का,

महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न
तीर्थपुरी : विदर्भ वेगळा करून महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तर महाराष्ट्र विकण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना तुम्ही निवडून देणार का, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला व उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन केले.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांच्या प्रचारार्थ मंगळवारी तीर्थपुरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. संतोष सांबरे, माजी आमदार अण्णासाहेब उढाण, शिवाजी चोथे, डॉ. हिकमत उढाण, सतीश घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे पुढे म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान मोदी पंढरपूरच्या सभेत म्हणतात, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. तोच अर्ध्या तासात लातूरमध्ये देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी म्हणतात, वेगळा विदर्भ करू. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर मोठे घोटाळे करून महाराष्ट्र विकायचाच प्रयत्न सुरू केल्याची टीका त्यांनी केली. शिवछत्रपतींच्या नावाने भाजप मत मागतात. लहान मुले विचारतात, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, मग ते पुन्हा मुख्यमंत्री कसे होणार. राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना सिंचन घोटाळ्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला.
राज्याची सत्ता शिवसेनेच्या हातात द्या, मग अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखवू. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठिवरील ओझे कमी करण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुखांचे होते, तेही पूर्ण करू. शेतकरी, महिला, युवकांचे प्रश्न सोडवू, असेही ठाकरे म्हणाले. गेल्या पाच वर्षात घनसावंगी मतदारसंघात राजेश टोपेंनी काय केले? असा सवाल करून ठाकरे म्हणाले, एक्स्प्रेस कालव्याची व रस्त्यांची कामे झाली का, ५२ गावातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही.
यावेळी रणजितसिंह उढाण, डॉ. राजन उढाण, भाऊसाहेब पाऊलबुधे, हरीहर शिंदे, श्रीकृष्ण बोबडे, बाबासाहेब इंगळे, जगन काकडे, भास्कर मगरे, शिवाजी शिवतारे आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अॅड. कीर्ती उढाण व त्यांचे पती जि.प. सदस्य श्यामनाना उढाण यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी उढाण दाम्पत्याचे पुष्पहाराने स्वागत केले. (वार्ताहर)