भाजपा प्रदेशाध्यक्षांची गुप्त बैठक

By Admin | Updated: June 19, 2014 00:21 IST2014-06-19T00:06:43+5:302014-06-19T00:21:21+5:30

हिंगोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हिंगोली येथे भेट देऊन एका माजी आमदारांच्या घरी गुप्त बैठक घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

BJP state president's secret meeting | भाजपा प्रदेशाध्यक्षांची गुप्त बैठक

भाजपा प्रदेशाध्यक्षांची गुप्त बैठक

हिंगोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हिंगोली येथे भेट देऊन एका माजी आमदारांच्या घरी गुप्त बैठक घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील राजकारणाने अनपेक्षितपणे वळण घेतले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील राजकारणाची जी समीकरणे होती, ती आता पूर्णत: बदलली आहेत. जशी-जशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशा राजकीय घडामोडीही वाढत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस सोमवारी हिंगोली येथे आले होते. त्यांच्या दौऱ्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही नव्हती. परळीहून नागपूरकडे कारने निघालेले आ. फडणवीस सोमवारी हिंगोली येथे एका माजी आमदारांच्या निवासस्थानी चहा घेण्यासाठी थांबले. यावेळी जिल्ह्याच्या राजकारणावर बरीच चर्चा झाली. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेल्या या चर्चेमुळे आगामी काळात पुन्हा राजकीय गणिते बदलतील, असे जाणकारांचे मत आहे. आ. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस मोजकेच नेते उपस्थित होते. अत्यंत गुप्तपणे ही बैठक का घेण्यात आली? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला देशभरात जे यश मिळाले, तेच यश आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष फडणवीस जोमाने कामाला लागले आहेत. हिंगोली जिल्ह्यात भाजपाची फारशी ताकद नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचा एकही सदस्य निवडून येऊ शकला नाही. वसमतचे नगराध्यक्षपद युतीतील समझोत्यानुसार सध्या भाजपाकडे आहे. या पालिकेत केवळ भाजपाचे ५ सदस्य आहेत. तर हिंगोली नगर पालिकेत केवळ २ सदस्य आहेत. कळमनुरी पालिकेत तर भाजपाला खातेही उघडता आलेले नाही. राष्ट्रीय स्तरावरील पक्षाची जिल्ह्यातील दयनिय अवस्था संपविण्यासाठी आ. फडणवीस यांनी कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील काही दिग्गज नेतेमंडळी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीही कामाला लागली
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष लागले आहेत. हिंगोली विधानसभेची जागा काँग्रेसकडे असल्याने आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. तर वसमतमध्ये राष्ट्रवादीचे आ.जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून नवनिर्वाचित काँग्रेसचे खा. राजीव सातव व राष्ट्रवादीचे नवनियुक्त विधान परिषदेचे सदस्य रामराव वडकुते यांचा एकत्रितरित्या जाहीर सत्कार करण्यात आला. असे असले तरी वडकुते यांनी मात्र राष्ट्रवादीने स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढवावी, असे वैयक्तिक मत व्यक्त केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. शिवाय हा चर्चेचाही विषय झाल्याचे दिसून येत आहे.
दौऱ्याची भाजपा नेत्यांनाही माहिती नाही
जिल्ह्यात दयनीय अवस्था असलेल्या भाजपाची ताकद वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी कसली कंबर.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश मिळावे, यासाठी सुरू केले प्रयत्न.
येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात काही दिग्गज नेतेमंडळी भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता.
जिल्ह्यात राजकीय घडामोडी वाढू लागल्या.

Web Title: BJP state president's secret meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.