भाजपा, शिवसेनेत ‘समांतर’ राजकारण
By Admin | Updated: January 6, 2015 01:12 IST2015-01-06T00:46:03+5:302015-01-06T01:12:21+5:30
औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेतील करारावर विशेष सभा घेण्याची मागणी करण्यासाठी महापौर कला ओझा, नगरसचिवांना पत्र देण्याची भूमिका सोमवारी स्पष्ट केली

भाजपा, शिवसेनेत ‘समांतर’ राजकारण
औरंगाबाद : भाजपाने समांतर जलवाहिनीच्या योजनेतील करारावर विशेष सभा घेण्याची मागणी करण्यासाठी महापौर कला ओझा, नगरसचिवांना पत्र देण्याची भूमिका सोमवारी स्पष्ट केली, तर शिवसेनेने सुभेदारी विश्रामगृहावर काही नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीची विशेष बैठक घेतली. सत्ताधारी युतीमध्येच ‘समांतर’ वरून राजकारण पेटले असून जनतेला पाणीपुरवठा वेळेत होणार की नाही. याचे उत्तर मात्र अजूनही मिळालेले नाही.
स्थायी समिती सदस्यांनी विशेष सभेची मागणी केली आहे; परंतु त्यावर महापौरांनी विचार केलेला नाही. शिवसेनेची विशेष बैठक झाल्यामुळे विशेष सभा होणार की नाही. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
योजनेमुळे जनता वेठीस धरली जात आहे. त्यामुळे करारातील सर्व तरतुदी, अटी, शर्तींवर चर्चा होण्यासाठी महापौरांनी विशेष सभा घ्यावी यासाठी पत्र देण्यात येईल. असे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बोराळकर म्हणाले, समांतर जलवाहिनी योजनेसाठी विशेष सभा झाली पाहिजे. लोकांना कळाले पाहिजे की, त्यांच्यावर कशाचा बोजा पडणार आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे. भाजपा जनतेच्या बाजूने राहणार आहे. राजू शिंदे हे सभापती असताना योजनेचा करार झाला आहे. मग आज होणारा विरोध निवडणुकीच्या तोंडावर आहे का? यावर बोराळकर म्हणाले, त्यावेळी फक्त बेसिक माहिती देण्यात आली. करार वेगळाच झाला, योजनेला ग्लॅमर देण्यात आले. अधिकाऱ्यांनी नंतर करारात काय केले हे समोर आलेले नाही. सध्या केंद्र, राज्यात भाजपाचे सरकार आहे. शासनाला पीपीपी रद्द करून निधी आणण्यासाठी पुढाकार घेऊ. जनता वेठीस धरली जाईल, अशी योजना काय कामाची, असा सवाल त्यांनी केला. माजी आ. किशनचंद तनवाणी हे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपाच्या शिष्टमंडळासोबत आले होते. तनवाणी म्हणाले, योजनेतील सर्व तरतुदी समोर आल्या पाहिजेत.
आयुक्तांच्या भेटीपूर्वी भाजपा नगरसेवकांची विकासकामे रखडल्यामुळे उपमहापौर संजय जोशी यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी माजी महापौर डॉ.भागवत कराड, शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.