भाजप आ. प्रवीण दरेकरांना कॉलवर शिवीगाळ; रेकॉर्डिंग केली व्हायरल, वादग्रस्त इसम अटकेत 

By सुमित डोळे | Published: March 1, 2024 01:22 PM2024-03-01T13:22:08+5:302024-03-01T13:22:44+5:30

याप्रकरणात बातमी दाखवणाऱ्या पेजचा चालकही सहआरोपी

BJP MLA Praveen Darekar abused on call; Recording went viral, controversial Isam arrested | भाजप आ. प्रवीण दरेकरांना कॉलवर शिवीगाळ; रेकॉर्डिंग केली व्हायरल, वादग्रस्त इसम अटकेत 

भाजप आ. प्रवीण दरेकरांना कॉलवर शिवीगाळ; रेकॉर्डिंग केली व्हायरल, वादग्रस्त इसम अटकेत 

छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांना कॉल करून आक्षेपार्ह टिप्पणी करत शिवीगाळ करण्यात आली. रमेश पाटील (रा. दलालवाडी, पैठण गेट) असे कॉल करणाऱ्या इसमाचे नाव आहे. या प्रकारानंतर दरेकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. बुधवारी रात्रीतूनच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मध्यरात्री ३ वाजता गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी (दि. २९) सकाळी पाटीलला अटक केली. त्याच्यासह रेकॉर्डिंग क्लिपचे वृत्त दाखवून व्हायरल करणाऱ्या एनआरके नेटवर्क या फेसबुकवरील न्यूज पेजधारकालाही यात आरोपी करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून रमेश पाटील आंदोलनाच्या कारणाने अनेक नेत्यांना कॉल करून शिवीगाळ करणे, धमकावण्याचे प्रकार करत आहे. बुधवारी दुपारी तो निवेदनाच्या कारणाने काही काळ पोलिस आयुक्तालयातही हजर हाेता. त्याच दरम्यान त्याने आमदार दरेकर यांना कॉल करून आक्षेपार्ह वक्तव्य केले. नंतर शिवीगाळ करून धमकी दिली. कॉल रेकॉर्ड करून ती क्लिप त्याने विविध सोशल मीडियावर वृत्त पोस्ट करणाऱ्या पेजद्वारे व्हायरल केली.

वरिष्ठ पातळीवरून याप्रकरणी सूत्रे हलल्यानंतर पोलिस विभागही कामाला लागला. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी तत्काळ पाऊल उलचण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी त्याचा शोध सुरू केला. मध्यरात्री ३ वाजता क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रमेश सायंकाळी रात्री ९ वाजताच पसार झाला. रात्रभर तो घरी परतला नाही. सकाळी तो जवाहरनगर परिसरातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती कळताच बोडखे यांनी सहकाऱ्यांसह जात त्याला अटक केली. निरीक्षक रेखा लोंढे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

वादग्रस्त पार्श्वभूमी
रमेशने यापूर्वी नारायण राणे, गुलाबराव पाटील, रामदास कदम, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना कॉल करून शिविगाळ केली आहे. नोव्हेंबर, २०२३ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. ‘तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे आहे’, असा उल्लेख असलेले वादग्रस्त बॅनर त्याने लावले होते. शिवाय, पत्त्याच्या क्लबविरोधात अर्धनग्न होत पोलिस आयुक्तालयासमोर गेला होता. तेव्हा उपस्थित महिला पोलिसांसमोर त्याच अवस्थेत उभा राहिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

Web Title: BJP MLA Praveen Darekar abused on call; Recording went viral, controversial Isam arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.