भाजपने केली सेनेची कोंडी!
By Admin | Updated: April 26, 2016 00:12 IST2016-04-25T23:59:54+5:302016-04-26T00:12:46+5:30
औरंगाबाद : सातारा येथील मनपा निवडणुकीत शिवसेनेला जोरदार चपराक दिल्यानंतर आता भाजपने महापालिकेतील प्रभाग समिती निवडणुकांमध्येही सेनेची जोरदार कोंडी करणार आहे.

भाजपने केली सेनेची कोंडी!
औरंगाबाद : सातारा येथील मनपा निवडणुकीत शिवसेनेला जोरदार चपराक दिल्यानंतर आता भाजपने महापालिकेतील प्रभाग समिती निवडणुकांमध्येही सेनेची जोरदार कोंडी करणार आहे. कमी संख्याबळ असतानाही भाजपने चार वॉर्ड समित्यांवर दावा केला आहे. या चारही समित्यांवर भाजपने वर्चस्व गाजवले तर शिवसेनेची बरीच कोंडी होणार हे निश्चित.
सातारा निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सेनेचा चक्रव्यूह भेदून काढला. साताऱ्यात यश मिळाल्यानंतर तनवाणी यांनी मनपात लक्ष घातले आहे. यंदा प्रथमच मनपात ९ प्रभाग समित्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी २६ एप्रिलपासून अर्ज वाटप सुरू होणार आहे. महापालिकेत शिवसेना-भाजपच्या संख्याबळानुसार ४ सभापतीपद भाजपकडे तर ३ सेनेच्या वाट्याला येणार आहेत. भाजपने गजानन बारवाल यांच्या अपक्ष आघाडीला सोबत घेतले आहे. सोमवारी दुपारी आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, नगरसेवक नंदकुमार घोडेले, उपमहापौर प्रमोद राठोड, गटनेते बापू घडामोडे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. सेना-भाजप युतीमध्ये ही निवडणूक लढवणार असल्याचे उभय पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
मनपाच्या निवडणुका होऊन वर्ष उलटले तरी प्रभाग समिती सभापतींची निवडणूक होऊ शकली नव्हती. ९९ वॉर्डांसाठी असलेल्या ६ प्रभागांचा विस्तार करून ११३ वॉर्डांसाठी ९ प्रभाग तयार करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.
सातारा-देवळाई वॉर्डांच्या पोटनिवडणुका लागल्याने प्रभाग रचना लांबणीवर पडली होती. त्यानंतर आता प्रभाग समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
उद्या २६ एप्रिल रोजी अर्ज वाटप करण्यात येणार असून, २७ रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत, तर २८ रोजी सकाळी १० वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका होणार आहेत. भाजपच्या वतीने २, ४, ६, ७ प्रभाग समिती सभापतीची निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दोन समित्यांवर एमआयएम दावा करीत आहे.