भाजपाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:03 IST2017-06-15T00:01:36+5:302017-06-15T00:03:23+5:30

परभणी : निवडणुकीच्या काळात भाजपाने खोटी आश्वासने दिली़ शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता बैठकीत बोलताना केला़

The BJP destroyed the farmers | भाजपाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले

भाजपाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निवडणुकीच्या काळात भाजपाने खोटी आश्वासने दिली़ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत बोलताना केला़
राष्ट्रवादीच्या वतीने पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पक्षाचे नेते जिल्हा दौऱ्यावर आले होते़ यानिमित्त शहरातील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली़ यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते़ व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ चित्रा वाघ, जिल्हा प्रभारी प्रकाश सोळंके, आ़ विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, जि़ प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, आ़ रामराव वडकुते, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, स्वराजसिंह परिहार आदींची उपस्थिती होती़ अजित पवार म्हणाले, भाजपाने निवडणुकीत खोटी आश्वासने दिली़ डिझेल, पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होत आहे़ शेतमालाला भाव दिला जात नाही़ कर्जमाफीबाबत शब्दांचा खेळ केला जात आहे़ परभणी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात एक तरी नवा उद्योग या सरकारने आणला आहे़, असा सवाल करून ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जावून पक्षाचे विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत़ जिल्हा परिषदेत पक्ष सत्तेत असल्याने लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, परभणी महानगरपालिकेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी़ पक्षांतर्गत मतभेद असतील तर आपसात बसून मिटवावेत किंवा पक्षश्रेष्ठींसमोर मांडावेत़ प्रसार माध्यमांपर्यंत पोहचून हे मतभेद चव्हाट्यावर आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले़ पदाधिकाऱ्यांनीही निर्णय घेताना कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावी, असे सांगून अजित पवार यांनी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पक्षसंघटनाबाबत घेतलेल्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले़ यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागावे़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाकाजाचा दर दोन-तीन महिन्याला आढावा घेतला जाईल़, पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे़ दरम्यान, दिवसभर पक्षाच्या विविध सेलची तसेच तालुकानिहाय पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली़ तसेच अजीत पवार व सुनील तटकरे यांनी वैयक्तीकरित्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही चर्चा केली़ सायंकाळी परभणी शहरातील नगरसेवकांची बैठक झाली़ या बैठकीत काही नगरसेवकांनी महापौर पदासाठी पक्षाने निवडलेल्या अपक्ष उमेदवाराविषयी व मनपातील गटनेत्याविषयी तक्रारी केल्या़ तसेच विश्वासात घेऊन संबंधितांची निवड केली नसल्याचे सांगितले़ आ़ दुर्राणी यांनी मात्र पक्ष हितासाठीच निर्णय घेतला असल्याचे सांगितले़

Web Title: The BJP destroyed the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.