बागडे, दानवे यांच्या मतदारसंघात भाजपचा सातव्यांदा पराभव
By Admin | Updated: July 27, 2016 00:46 IST2016-07-27T00:17:28+5:302016-07-27T00:46:43+5:30
फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काल घोषित झाला. या निकालाने पुन्हा एकदा भाजपला चपराक बसली. भाजपचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानसभेचे

बागडे, दानवे यांच्या मतदारसंघात भाजपचा सातव्यांदा पराभव
फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काल घोषित झाला. या निकालाने पुन्हा एकदा भाजपला चपराक बसली. भाजपचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रतिनिधित्व करीत असलेल्या फुलंब्री मतदारसंघात भाजपचा हा ओळीने सातवा पराभव आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे (दादा) यांच्या लोकसभेच्या मतदारसंघात फुलंब्री तालुक्याचा समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय.
राज्यात आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार डॉ. कल्याण काळे यांचा पराभव करून दहा वर्षांनंतर फुलंब्री मतदारसंघावर ताबा मिळविला होता; परंतु त्यानंतर मात्र या मतदारसंघात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत डॉ. काळे यांनी बागडे, दानवे जोडगोळीला मात दिली आहे. अर्थात, काळे यांचा विधानसभेतही अत्यल्प मतांनी पराभव झाला होता. त्याचे शल्य बोचत असल्यामुळे काळे यांनी त्यानंतर मतदारसंघावर चांगलीच मांड बसविली. मोदी लाटेत विधानसभा खेचून घेणारे बागडे नाना यांना याच मतदारसंघातून काळे यांनी तत्पूर्वी दोनदा पराभूत केले होते, तर जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना निकराची झुंज दिली होती.
फुलंब्री मतदारसंघाचा विस्तार थेट औरंगाबाद शहरापर्यंत आहे. औरंगाबाद शहरातील ४ वॉर्डांचा समावेश फुलंब्री मतदारसंघात होतो. त्यामुळे फुलंब्रीतील निकालाचे पडसाद औरंगाबादेतसुद्धा उमटतात. २०१४ च्या विधानसभेनंतर सर्वत्र मोदी लाटेचा करिश्मा होता. या स्थितीत औरंगाबाद व फुलंब्री तालुका खरेदी- विक्री संघाच्या निवडणुका झाल्या. त्या काळे यांनी बहुमतांनी जिंकल्या. फुलंब्रीचा देवगिरी सहकारी साखर कारखानाही मिळविला. जिनिंग-प्रेसिंगवर कब्जा केला. भाजपच्या ताब्यात असलेल्या प्रेरणा बँकेवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालकपदही मिळविले. विधानसभेनंतरच्या १२ महिन्यांत काळे यांची ही राजकीय कमाई होती.
फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीतील १० वर्षांची सत्ता राखताना पुन्हा काळे यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखविला. त्यांनी काँग्रेसच्या मदतीला शिवसेना व राष्ट्रवादीचा एक गट घेतला. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते राजेंद्र ठोंबरे यांना सोबतीला घेत शेतकरी सहकारी विकास पॅनलची स्थापना केली.
काळे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषविणारे शिवाजी पाथ्रीकर, विधानसभेत डॉ. काळे यांच्या पराभवास हातभार लावणाऱ्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाला नानांनी हाताशी धरून आदर्श शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरविले; परंतु त्यांच्या पदरी सपशेल अपयश आले. नानांच्या पॅनलला केवळ तीन जागा, तर काळे गटाला तब्बल १५ जागा मिळाल्या. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच नाना -दादांचे बिनसले होते. त्यामुळे लोकसभेच्या रणांगणात नाना दादांच्या मदतीला आले नाहीत, तर विधानसभेत नानांचे तिकीट कापण्यासाठी दादांनी ताकद पणाला लावल्याच्या उठलेल्या वावड्यांचे विस्मरण अद्याप नागरिकांना झालेले नाही. तसे ते होऊ नये, याची पूर्ण खबरदारी नाना-दादाही घेताना दिसतात. फुलंब्री मतदारसंघाचे प्रतिनिधित्व नानाकडे असल्यामुळे दादा फुलंब्रीच्या कोणत्याही निवडणुकीत कधीही सक्रिय दिसले नाहीत. निवडणुकीचा प्रचार फार्मात असताना नानांनी दादांच्या प्रतिस्पर्धाचे आवतन स्वीकारत सिल्लोड गाठले. त्यामुळे दादांच्या जखमेवर मीठ न चोळले गेले असते तरच नवल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने सतत सातवा पराभव माथी मारून मग दादांनी उट्टे काढल्याची खमंग चर्चा मतदारसंघात न रंगती तरच नवल. शेवटी विरोधकांचे उणेपण उघड करणे हे राजकारण्याचे एक शस्त्रच. या शस्त्राचा दादा खुबीने वापर करतात, असे त्यांचे समर्थक सांगतात. दुसऱ्या बाजूला नाना मोठ्या सत्तास्थानी असूनही मतदारसंघात त्याचा प्रभाव काही दिसत नाही. कार्यकर्त्यांच्या हाताला काम नाही. काँग्रेस सरकारच्या काळात फुलंब्री तालुक्यात रोजगार हमीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ६०० विहिरींपैकी ४०० विहिरी भाजप सरकारने रद्द केल्या. या मुद्याचा डॉ. काळे यांनी प्रचारात खुबीने वापर केला. त्याचा प्रतिवाद करायला भाजपकडून कुणीही समोर आला नाही. दुसरीकडे सेना-भाजपमधील ताणलेले संबंधही येथे कामी आले.
-शांतीलाल गायकवाड