दहशतवादी भुल्लरच्या पॅरोलवर बिट्टांची नाराजी
By Admin | Updated: April 26, 2016 00:12 IST2016-04-26T00:02:21+5:302016-04-26T00:12:30+5:30
औरंगाबाद : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी देवेंदर पालसिंह भुल्लर याला पॅरोलवर सोडण्याच्या निर्णयावर आॅल इंडिया अॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

दहशतवादी भुल्लरच्या पॅरोलवर बिट्टांची नाराजी
औरंगाबाद : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी देवेंदर पालसिंह भुल्लर याला पॅरोलवर सोडण्याच्या निर्णयावर आॅल इंडिया अॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भुल्लरसारख्या दहशतवाद्यांवर केवळ व्होट बँकेसाठीच दया दाखविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बॉम्बगोळ्यांच्या दहशतवादापुढे हार मानली नाही; परंतु आता राजकीय दहशतवादापुढे मात्र आपण पराभूत झालो आहोत, असेही ते म्हणाले.
खाजगी कामासाठी शहरात आलेल्या बिट्टा यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या दहशतवाद्यांनी १९९३ साली दिल्लीत बिट्टा यांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि बिट्टा यांच्यासह ३१ जण जखमी झाले होते. या हल्ल्यातील आरोपी देवेंदर पालसिंह भुल्लर यांना दोन दिवसांपूर्वीच पॅरोलवर सोडण्यात आले. हा निर्णय पंजाबातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्होट बँकेच्या राजकारणापायीच घेतला असल्याचा आरोप बिट्टा यांनी केला. बिट्टा म्हणाले, २००१ साली भुल्लरला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली; परंतु कपिल सिब्बल आणि तुलसी यांनी सर्वोच्च न्यायालयातून भुल्लरची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित केली. त्याच्या बदल्यात काँग्रेसने सिब्बल यांना मंत्रीपदाचे आणि तुलसी यांना खासदारकीचे बक्षीस दिले. दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही सत्तेत आल्यापासून भुल्लरला वाचविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
बिट्टा ज्या हॉटेलात थांबले होते, तेथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दहशतवाद्यांपासून जिवाला धोका असल्यामुळे बिट्टा यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केलेली आहे. त्यामुळे प्रवासासाठी बुलेटप्रूफ गाडी, दिमतीला ३६ शस्त्रधारी कमांडो व पोलिसांचाही फौजफाटा होता.