बिऱ्हाड निघालयं निवडणूक प्रचाराला...!

By Admin | Updated: October 7, 2014 00:16 IST2014-10-06T23:53:53+5:302014-10-07T00:16:46+5:30

संजय तिपाले, बीड ज्येष्ठ नाट्यकलावंत स्व़ प्रा़ लक्ष्मणराव देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ हे नाटक सर्वपरिचित आहे़ बीड लोकसभा पोटनिवडणुकीतील एका उमेदवाराने या नाटकाप्रमाणेच बिऱ्हाड बांधलयं;

Birbhad election campaign election ...! | बिऱ्हाड निघालयं निवडणूक प्रचाराला...!

बिऱ्हाड निघालयं निवडणूक प्रचाराला...!


संजय तिपाले, बीड
ज्येष्ठ नाट्यकलावंत स्व़ प्रा़ लक्ष्मणराव देशपांडे यांचे ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ हे नाटक सर्वपरिचित आहे़ बीड लोकसभा पोटनिवडणुकीतील एका उमेदवाराने या नाटकाप्रमाणेच बिऱ्हाड बांधलयं; परंतु ते लग्नासाठी नव्हे तर खासदार होण्यासाठी़ किरायाच्या गाडीत छोटासा संसार लादून त्यांचा दरकोस दरमुक्काम प्रचारासाठी सुरु आहे़ पत्नी, मेहुणी अन् दोन चिमुकले असा मोजकाच लवाजमा घेऊन त्यांचे गावोगावी दौरे सुरुआहेत़
प्रचाराच्या या अजब तऱ्हेने राजकीय आकर्षण जनमाणसात कसे खोलवर रुजलेले आहे, याची प्रचिती येते़ बीड लोकसभा पोटनिवडणुकीतील ४० वर्षीय अपक्ष उमेदवार अविनाश नामदेव वानखेडे हे ‘योगायोगा’नेच राजकारणात आले़ ते मूळ वरुड (जि़ अमरावती) येथील रहिवासी़ त्यांनी स्थापत्य अभियंता ही पदवी मिळवून कामाला सुरुवात केली़ त्यांची पत्नी उज्वला पदवीधर असून मेहुणी निताचे शिक्षण एम़ ए़ इंग्रजी झाले आहे़ त्यांना भक्ती व कृपा या दोन मुली आहेत. २००४ मध्ये अविनाश वानखडे श्री़ श्री़ रविशंकर यांच्या संपर्कात आले़ योगा, आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी जलसंधारणाचे काम सुरु केले़ २० एप्रिल २०१३ रोजी ते बीड तालुक्यातील पांढऱ्याचीवाडी येथे कुटुंबियांसमवेत पोहोचले़ किरायाचे घर घेऊन ते स्थायिक झाले़ नरेंद्र मोदी बडोदा सोडून वाराणसीतून लढतात तर मग अमरावतीऐवजी मी बीड निवडले म्हणून काय झाले? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी बीडमधील उमेदवारीचे समर्थन केले़
३८ हजारात लढवली लोकसभा
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत अविनाश वानखडे यांनी अपक्ष म्हणून नशीब आजमावले़ पैशाअभावी बसमधून प्रचार केला होता़ त्यांनी २८०० मते घेतली होती़ ३८ हजार रुपये इतका त्यावेळी प्रचार खर्च झाला होता़
गावकऱ्यांनी हाकलल्याने
संसार उघड्यावर
‘तू खूपच निवडणुका लढवितो’ असे म्हणत पांढऱ्याचीवाडी येथील गावपुढाऱ्यांनी हाकलल्याचा आरोप अविनाश वानखडे यांनी केला़ त्यामुळे कुटुंबियांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचे ते म्हणाले़ मंदिर, शाळा येथे मुक्काम करुन ते पुढच्या प्रवासाला निघतात़ अंथरुण, पांघरुण जेवण बनविण्याचे सर्व साहित्य असा छोटासा संसार गाडीत लादून ते गावोगावी फिरत आहेत़ बीडच्या मातीत प्रेमाचे लोक आहेत़ १९ तारखेला जिंकलो तर दिल्ली नाही तर मुक्काम पोस्ट बीड़़़ अशा शब्दात त्यांनी आगामी भूमिका बोलून दाखवली़
लोकसभा पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याकरता अविनाश वानखडेंकडे पैसे नव्हते़ होती एक लोनवर घेतलेली काऱ ही कार विकून त्यांनी अर्ज भरला़ आपली लढाई भाजपाच्या उमेदवार डॉ़ प्रीतम मुंडेंसोबत असल्याचे ते सांगतात़ त्यांचा जाहीरनाम्यावर विश्वास नाही़ लोकांची प्रश्ने सोडविणे व विधायक कामे करणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी शारीरिक, भौतिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाचे मुद्दे प्रचारात प्रतिष्ठेचे केले आहेत़

Web Title: Birbhad election campaign election ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.