‘कयाधू’काठची जैवविविधता धोक्यात

By Admin | Updated: June 5, 2014 00:14 IST2014-06-04T23:36:04+5:302014-06-05T00:14:51+5:30

बालासाहेब काळे, हिंगोली जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली आणि एकेकाळी बारमाही वाहणारी कयाधू नदी सध्या मृतप्राय झाली आहे.

Biodiversity threat to 'Kayadhoo' | ‘कयाधू’काठची जैवविविधता धोक्यात

‘कयाधू’काठची जैवविविधता धोक्यात

बालासाहेब काळे, हिंगोली जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली आणि एकेकाळी बारमाही वाहणारी कयाधू नदी सध्या मृतप्राय झाली आहे. नदीकाठच्या वनस्पतींची अपरिमित तोड होऊन बेसुमार वाळू उपसा करण्यात आल्याने ‘कयाधू’ तीरावरील जैवविविधता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. नदीकाठी संस्कृती वसते, असे म्हटले जाते. माणसाचा अगदी प्राचीन काळापासून नदीशी संबंध आहे. आदिम अवस्थेपासून नद्या या माणसाच्या विकासाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. माणसाच्या प्रगतीमध्ये त्यांनी मोलाची साथ दिली आहे. म्हणून माणसानेही नद्यांचे महत्व जाणून त्यांना पवित्र देवतेचा दर्जा दिला. त्यांच्या काठावर मंदिरे वसविले, त्यांची तीर्थक्षेत्रे झाली. पण याच नदीकाठच्या संस्कृतीत वाढलेला माणूस आज कृतघ्न झाल्याचे दिसत आहे. एखाद्या भयंकर राक्षसाचे रूप धारण करून तो नद्यांनाच नष्ट करीत सुटला आहे. त्यामुळे सध्या बहुतांश नद्यांची प्रकृती बिघडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काही नद्यांचे रूप वाळू- मातीच्या उपशाने पार बिघडले आहे. काहींना न वाहण्याचा शाप मिळाला तर अनेक नद्यांची पात्रे गाळाने भरली आहेत. काही नद्या तर काठच न उरल्याने पात्र सोडून इकडेतिकडे भरकटल्या आहेत. नद्या बिघडल्याचा सर्वाधिक परिणाम त्यांच्या पाण्यावर जगणार्‍या सर्वच जीव-जंतूवर झाला आहे. शिवाय बारोमास वाहणार्‍या आणि शुद्धपाणी असणार्‍या नद्या हा आता इतिहास बनत चालला आहे. याला हिंगोलीची कयाधू नदीदेखील अपवाद राहिली नाही. हिंगोली शहराजवळून वाहणार्‍या ‘कयाधू’ ला कधी काळी ‘काया-धू’ असे म्हटले जाते. मानवी हाडांना झिजविण्याचे बळ या पाण्याच्या प्रवाहामध्ये होते, असे जुनी मंडळी सांगतात. पूर्वी या नदीचे पाणी मार्च महिन्यापर्यंत राहायचे. अलीकडच्या काळात ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच टिकत आहे. अवैधरित्या होणार्‍या वाळू उपशामुळे त्या ठिकाणी येणारे स्थलांतरित पक्षी विसावणे बंद झाले आहे. पेंन्टेड स्टॉर्कसारखे पक्षी तसेच फ्लेमींगोचा थवा कयाधू तीरावर विसावलेला असायचा. त्यांच्या प्रवासातला हा महत्वाचा टप्पा राहत असे; परंतु कयाधू काठची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करणार्‍या या पक्ष्यांनी आपला मोर्चा इतर जलाशयांकडे वळविला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना हिंगोलीतील निसर्ग अभ्यासक डॉ. प्रेमेंद्र बोथरा यांनी सांगितले की, कयाधू नदीकाठी असलेल्या बाभूळ, अर्जुन आदी वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्यामुळे नदीकाठच्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. परिणामी प्रामुख्याने नदीकाठी राहणारे जलचर, बेडूक, पांढरे खेकडे, मरळ, मासे यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. शिवाय या सर्वांवर जगणार्‍या पानकावळा, बगळे, माळढोक, किंकर, टिटवी, ठोकर, किंगफिशर आदी पक्ष्यांचेही आयुष्य धोक्यात आले आहे. नदीकाठावरील छोट्या झुडपांमध्ये घरटी बांधून राहणारे सूर्यपक्षी, मुनिया या पक्ष्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. एके काळी पवित्र मानले जाणार्‍या कयाधू नदीचे पात्र सध्या गटारीचे दूषित पाणी, प्लास्टिक पिशव्यांनी भरलेले आहे. सतत वाहत राहणे हा नदीचा धर्म नव्हे, तर हक्कच आहे; परंतु तोच हिरावून घेतला गेल्याने नद्यांची बिघडलेली स्थिती शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या ºहासालादेखील कारणीभूत ठरत आहे. सेनगाव तालुक्यातून उगम पावणारी कयाधू नदी कोळसा, सुकळी भागातून हिंगोली तालुक्यात प्रवेशते. नर्सी नामदेव, घोटा, बेलवाडीपासून ती हिंगोली शहरात पोहोचते. त्यानंतर समगा मार्गे औंढा तालुक्यातील पूर, कंजारा आदी गावांतून पुढे कळमनुरी तालुक्यात जाते. आखाडा बाळापूर, शेवाळा मार्गे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात जाऊन कयाधू नदी प्रवेशते. जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कयाधू नदीच्या दुतर्फा भूजलही दुषित झाल्याने सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. कयाधू नदीप्रमाणेच शहरातील जलेश्वर तलावाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. निजाम काळात पावसाचे पाणी साठवून त्याचा नागरिकांसाठी वापर केला जायचा. यासाठी जलेश्वर तलाव उपयोगी ठरत असे. शहरात सध्याच्या आदर्श महाविद्यालयाच्या टेकडीपासून रेल्वे स्थानक, सिद्धार्थ कॉलनी, खुशालनगर मार्गे पावसाचे पाणी मोठ्या नाल्याद्वारे थेट जलेश्वर तलावात पोहोचायचे. तलाव भरल्यानंतर गवळीपुरा भागातील नाल्याद्वारे ते कयाधू नदीकडे काढून दिले जात असे; परंतु मागील काही वर्षांत पावसाचे पाणी तलावात पोहोचण्याचा मार्गच बंद झाला आहे. शिवाय काही शेतकर्‍यांनी पंपाद्वारे पाणी उपसा केल्यामुळे तलावातील साठा कमी झाला आहे. उलट नागरिक नाल्यांचे सांडपाणी तलावामध्ये सोडण्याची व्यवस्था करून केरकचराही त्या ठिकाणी टाकत आहेत. याचा त्रास जलेश्वर मंदिरात जाणार्‍या भाविकांना होत असल्याचे पुजारी सुभाष पुरी यांनी सांगितले. भाविक मंदिरात वाहिलेली फुले व नारळ, प्लास्टिक पिशव्या तलावात फेकत असल्याने त्या ठिकाणी उकिरड्याचे स्वरूप आले आहे. शिवाय तलावाभोवती झालेल्या अतिक्रमणाच्या विळख्यात पक्षी जीवनाची घुसमट होत आहे. जलेश्वर तलाव परिसरात पूर्वी रोझी स्टरलिंग पक्षी हजारोंच्या संख्येने येत असत. आता ही संख्या अत्यंत कमी झाली आहे. या भागातील वेडी बाभूळ व इतर झाडे नष्ट झाल्याने स्थलांतरीत पक्ष्यांना रात्री विसावण्यासाठी जागाच उपलब्ध राहिलेली नाही. पियजंट टेल्ड व ब्रांझ टेल्ड जकाना या दोन पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने अनेक वर्षांपासून जलेश्वर तलावास भेटी देण्याची त्यांची परंपरा मोडीत निघाली आहे. तलावामध्ये जलपर्णी वाढल्याने पक्ष्यांसाठी उपयोगी ठरणार्‍या वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पक्षी अंडी घालून ज्या ठिकाणी वास्तव्य करायचे, त्या वनस्पतीच नष्ट झाल्याने त्यांची पुढची पिढी निर्माण होण्यासाठी आधिवासच शिल्लक राहिलेला नाही. शिवाय पक्ष्यांचे नैसर्गिक अन्न वाढत्या मासेमारीमुळे संपत आहे. जलेश्वर तलावात एकीकाळी दिसणारे निळे, पांढरे, गुलाबी कमळ दुर्मिळ झाले आहे. पर्यावरणाचे रक्षण करून सर्वांना जीवन देणार्‍या नद्या व तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया गणेश साहू यांनी दिली. हिंगोली शहराजवळून वाहणार्‍या ‘कयाधू’ ला कधी काळी ‘काया-धू’ असे म्हटले जाते.मानवी हाडांना झिजविण्याचे बळ या पाण्याच्या प्रवाहामध्ये होत कयाधू काठची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांनी आपला मोर्चा इतर जलाशयांकडे वळविला आहे.प्रामुख्याने नदीकाठी राहणारे जलचर, बेडूक, पांढरे खेकडे, मरळ, मासे यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. शिवाय या सर्वांवर जगणार्‍या पानकावळा, बगळे, माळढोक, किंकर, टिटवी, ठोकर, किंगफिशर आदी पक्ष्यांचेही आयुष्य धोक्यात आले आहे. कयाधू नदीप्रमाणेच शहरातील जलेश्वर तलावाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. निजाम काळात पावसाचे पाणी साठवून त्याचा नागरिकांसाठी वापर केला जायचा. पर्यावरणाचे रक्षण करून सर्वांना जीवन देणार्‍या नद्या व तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज

Web Title: Biodiversity threat to 'Kayadhoo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.