वाळूज येथून दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:13+5:302021-06-09T04:06:13+5:30
वाळूज महानगर : वाळूज येथून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ आसाराम ...

वाळूज येथून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूज येथून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ आसाराम वाघ (रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) यांनी शुक्रवारी (दि.४) रात्री राहत्या घरासमोर दुचाकी (एम.एच.२०, सी.ई.२६०५) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
बजाजनगरात संशयित तरुण ताब्यात
वाळूज महानगर : गुन्हा करण्याच्या उद्देशाने रात्री लपून बसलेल्या संशयित तरुणास गस्तीवरील पोलीस पथकाने बजाजनगरात पकडले. अशोक विठ्ठल गुळे (२६ रा.रांजणगाव) हा शनिवारी (दि.५) मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील जयभवानी चौकात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसला होता. यावेळी गस्तीवरील पोलीस पथकाने अशोक गुळे यास संशयावरुन ताब्यात घेतले.
--------------------------
रांजणगावात दिव्यांगांना धनादेश वाटप
वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील २१२ दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये २ टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचे आदेश प्रशासनाने ग्रामपंचायतींना दिले आहेत. गावातील २१२ लाभार्थ्यांनी प्रत्येकी २ हजार प्रमाणे ४ लाख २४ हजार रुपयाचे धनादेश सरपंच कांताबाई जाधव, उपसरपंच शिवराम ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी पं.स. दीपक बडे, नंदिनी लोहकरे, पंकज हिवाळे, साईनाथ जाधव, सायराबानो सय्यद, कविता जाधव, अशोक जाधव, मोहनीराज धनवटे, सत्यशिला सुरुंग, नंदाबाई बडे, निर्मला पठाडे, संजीवनी सदावर्ते, योगिता महालकर, अश्विनी हिवाळे, भीमराव कीर्तीकर आदींची उपस्थिती होती.
-----------------------
रांजणगावातून तरुणी बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगावातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या बहिणीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. सुधा शंकर तलवारे (२१ रा.साईनगर, रांजणगाव) ही शनिवारी (दि. ५) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास झेरॉक्स काढून येते, असे म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिची बहीण गोदावरी तलवारे यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
-------------------------------
तीसगावात रांगोळी स्पर्धा
वाळूज महानगर : तीसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने रांगोळी काढून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे लावण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेतील रुपाली कनिच्छे, सपना सूर्यवंशी यांच्यासह विजेत्या स्पर्धकांना सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे, ग्रामविकास अधिकारी ए.आर.गायकवाड, संजय जाधव, जगदीश शेलार, ईश्वर तरय्यावाले आदींच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
--------------------------