दुचाकी विक्रीसाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:05 IST2019-02-16T21:05:33+5:302019-02-16T21:05:43+5:30
चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी आलेला चोरटा एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना शनिवार (दि.१६) सकाळी बजाजनगरात घडली.

दुचाकी विक्रीसाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
वाळूज महानगर : चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी आलेला चोरटा एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना शनिवार (दि.१६) सकाळी बजाजनगरात घडली. अंबर विठ्ठल देवकर (२१ रा. फर्शी फाटा, सिल्लोड) असे या चोरट्याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या जवळपास एक लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केया आहेत.
बजाजनगरातील मोहटादेवी चौकालगतच्या भाजीमंडई परिसरात एक व्यक्ती दुचाकीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी डीबी पथकाच्या मदतीने मोहटादेवी चौकात शनिवारी सकाळी सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहकास दुचाकी खरेदीसाठी पाठविले असता अंबर देवकर हा ८ हजार रुपयांत त्यास दुचाकी देण्यास तयार झाला. ही चर्चा सुरु असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. तीसगाव परिसरातील कल्याण सिटी येथून काही दिवसांपूर्वी ही दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. तसेच अंबर देवकर चोरी केलेल्या दुचाकी साजापूर परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी लपवून ठेवत होता.
पोलिस पथकाने त्याच्या ताब्यातून ९५ हजार रुपये किमंतीच्या ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. अंबर देवकर याच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.