बिहारचा विजय निवडणूक आयोगाचा, त्यांच्या विरुद्ध लढा द्यावा लागणार; अंबादास दानवेंचा निर्धार!
By बापू सोळुंके | Updated: November 15, 2025 15:57 IST2025-11-15T15:54:22+5:302025-11-15T15:57:35+5:30
मराठवाड्यातील ५२ नगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र

बिहारचा विजय निवडणूक आयोगाचा, त्यांच्या विरुद्ध लढा द्यावा लागणार; अंबादास दानवेंचा निर्धार!
छत्रपती संभाजीनगर: मुंबई महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा दिलेला नारा हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. भाजप व शिंदेगटाला तोडीस तोड अशी आमची आघाडी आहे. मराठवाड्यातील ५२ नगर पालिकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवित आहे. उर्वरित नगरपरिषदांसंदर्भात उद्या रविवारी निर्णय होणार असल्याचे विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (दि.१५)पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रासारखी बिहारची अवस्था झाली,याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगाचा गैरवापर सुरू आहे. राज्यात शरद पवार , उद्धवसेना यांना दरनिवडणूकीत किमान ५० ते ६० जागा हमखास मिळतात. अशीच परिस्थिती बिहार मध्ये लालू प्रसाद यांच्या पक्षाची आहे. केवळ २५ जागा त्यांच्या येऊच शकत नाहीत. हा विजय निवडणूक आयोगाचा आहे, असा आरोप दानवे यांनी केला. गत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपात दिरंगाई झाली. शिवाय मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा असता तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या चार जागा वाढल्या असत्या, असे दानवे म्हणाले. मात्र, निवडणूक आयोगाविरोधात लढा द्यावा लागणार आहे, अन्यथा कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होईल.
अजित पवारांचा राजीनामा घ्यावा
भाजपा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करीत दानवे म्हणाले, बिहार निवडणुकीचा अजित पवार यांचा काही संबंध नाही.असे असताना पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शुभेच्छा द्यायला गेले नव्हते तर पार्थ पवार प्रकरणांत भेटायला गेले होते, असा आरोपही दानवे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी अजीत पवारांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपने कार्यकर्ते पळवले
आमच्या पक्षातील गंगापूरच्या अविनाश पाटील यांना उमेदवारी देतो असे, आमिष दाखवून भाजप आमदार आमदार प्रशांत बंब यांनी पळवून नेले होते. नंतर ते परत आले. भाजपकडे संघटन मजबूत आहे, तर आमचे कार्यकर्ते का पळवत आहे, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.