सरकार आल्यास गारपीटग्रस्तांना मोठी मदत
By Admin | Updated: May 12, 2014 00:07 IST2014-05-11T23:27:41+5:302014-05-12T00:07:42+5:30
तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे.

सरकार आल्यास गारपीटग्रस्तांना मोठी मदत
तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे. मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असताना राज्याने फक्त नऊशे कोटी रुपये देऊन गारपीटग्रस्तांची थट्टा केल्याचे सांगतानाच एनडीएचे सरकार येताच केंद्राकडून राज्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांना मोठी आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी सपत्नीक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ त्यानंतर प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी मुंडे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत जावई अमित पालवे, गौरव खाडे उपस्थित होते. राज्यात दलित अत्याचारात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसातच दलित अत्याचाराच्या ३० घटना घडल्याचे सांगत, राज्यात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १६५० दलित अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती मुंडे यांनी दिली. अत्याचारातील आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत, यावरुन सरकार गुन्हेगारास शिक्षा देण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असा आरोपही मुंडे यांनी यावेळी बोलताना केला. राज्यात कायद्याचा वचक राहिला नसल्याने रॉकेल, वाळू माफिया यांचे वर्चस्व निर्माण झाले असल्याचे सांगत सर्वसामान्य जनतेबरोबर कर्मचारी, अधिकारीही या राज्यात सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस अॅड. अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, उस्मानाबादचे माजी नगरसेवक धनंजय शिंगाडे, संजय निंबाळकर यांच्यासह विजय शिंगाडे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, विकास मलबा, महानंदा पैलवान, दत्ता राजमाने, प्रभाकर मुळे, सचिन रसाळ, बाळा शामराज, श्रीकांत हिरोळीकर, उमेश गवते, विपीन शिंदे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर) मराठवाड्यातील आठही जागा जिंकू-मुंडे लोकसभा निवडणुकीत एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळणार असून, नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हातील असा विश्वासही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपाला २३० ते २४० जागा मिळतील तर महाराष्ट्रात महायुतीस ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील आठही जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.