सायकल : श्रीमंतांची प्रतिष्ठा; गरिबांची उपजीविका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 08:35 PM2019-06-03T20:35:10+5:302019-06-03T20:36:43+5:30

अडगळीत पडलेली सायकल आज श्रीमंतांसाठी ठरतेय ‘स्टेटस सिम्बॉल’

Bicycle: for Rich its status; Liveliness of the poor | सायकल : श्रीमंतांची प्रतिष्ठा; गरिबांची उपजीविका

सायकल : श्रीमंतांची प्रतिष्ठा; गरिबांची उपजीविका

googlenewsNext
ठळक मुद्देशाश्वत वाहतुकीचे प्रतीक  सायकलवर अनेकांची उपजीविका 

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ना तिला महागडे पेट्रोल-डिझेल लागते, ना महिन्याकाठी सर्व्हिसिंगसाठी खूप सारे पैसे. बस पाच रुपयांत हवा भरून मागचे-पुढचे चाक फुल्ल करून घेतले आणि १५-२० रुपयांचे आॅयलिंग केले की झाली सवारी तय्यार...! असे सुख केवळ सायकलच्या बाबतीतच शक्य आहे. गरिबांचे वाहन अशी ओळख असलेली सायकल प्रतिष्ठित लोकांच्या घरीही मानाने मिरवू लागली आहे. 

३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून ओळखला जातो. सायकल हा शब्द जरी उच्चारला तरी अनेक जण त्यांच्या सुरेख भूतकाळात जातात आणि त्यांच्या त्या जुन्या सायकलवरून गावाची भ्रमंती करूनच परततात. आज पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या लोकांसाठी तर त्यांच्या तरुणपणी सायकल असणे ही गोष्टच मोठी आनंददायी असायची. काळाच्या ओघात प्रवास लांबला आणि सुबत्ता वाढू लागली तशी प्रत्येक घरची सायकल अडगळीत जाऊ लागली आणि दुचाकी, चारचाकी तिच्यापुढे मिरवू लागल्या. पण ‘जुने ते सोने’ या युक्तीप्रमाणे सायकलने पुन्हा एकदा तिचे महत्त्व सिद्ध केले. फिटनेससाठी सायकलचा पर्याय सर्वोत्तम आहे, असे अनेक डॉक्टरांनी सांगितल्यामुळे सायकल पुन्हा अनेक घरांमध्ये दिमाखात उभी असलेली दिसू लागली आहे. चारचाकी, दुचाकी गाडी दारात उभी असतानाही उत्तम प्रतीची सायकल दारात असणे, हे आजकाल ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

स्मार्ट सिटीत सायकल ट्रॅकच नाही
सायकल हे प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोत्तम असणारे वाहन आहे. सायकलस्वाराचे आरोग्य तर सायकल सांभाळतेच; पण पर्यावरणाचे आरोग्यही उत्तमपणे सांभाळते. त्यामुळे प्रत्येक शहरात सायकलस्वारांचे प्रमाण वाढणे, शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. औरंगाबाद शहरही स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. स्मार्ट सिटीच्या आराखड्यात शहरातील विविध रस्त्यांवर विशेष सायकल ट्रॅक असणे गरजेचे असते; पण औरंगाबाद शहरात मात्र कोणत्याही रस्त्यावर असे खास सायकल ट्रॅक उपलब्ध नाहीत. यामुळे सायकल चालविणे हे मोठे आव्हान ठरते आहे. कामानिमित्त सायकल चालविणाऱ्यांचे किंवा हौशी सायकलस्वारांचे प्रमाण शहरात बरेच आहे; पण सायकल ट्रॅक नसल्यामुळे सायकलचा पर्याय सुरक्षित मानला जात नाही. त्यामुळे शहरात लवकरात लवकर सायकल ट्रॅक निर्माण करावेत, अशी मागणी सायकलप्रेमी करीत आहेत. विशेष सायकल ट्रॅक नसल्यामुळे सायकलस्वारांना दुचाकी आणि चारचाकींच्या गर्दीतच सायकल चालवावी लागते. विशेषत: सिग्नल सुटल्यानंतर सर्व गाड्या भरधाव पुढे जातात आणि सायकलस्वार मात्र गर्दीत अडकून जातो. हे चित्र तर शहरात अनेक ठिकाणी दिसून येते. 

सायकलस्वारांच्या अपघातांचे प्रमाण कमी
आजच्या दुचाकीस्वारांना जणू वेगाचे वेड लागले आहे. यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. त्या तुलनेत मात्र सायकलस्वारांचा अपघात क्वचितच होतो. वेग नियंत्रणात असणे आणि आपल्या वाहनावर आपला ताबा असणे, हे याचे मुख्य कारण आहे. 

दरवर्षी होणारी सायकल विक्री
सायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी झाल्यामुळे विक्रीवर निश्चितच परिणाम झाला आहे; परंतु गीअर असणाऱ्या आणि स्पोर्टीलूकच्या सायकलची मागणी मात्र वाढते आहे. उच्चभ्रू लोक आणि तरुणांकडून दैनंदिन व्यायामाच्या उपयोगासाठी म्हणून या सायकल वापरल्या जातात. 

तीनचाकी सायकल विक्री
पूर्वी घरातल्या पहिल्या अपत्याला सायकल हमखास घेतली जायची. हीच सायकल मग दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्याकडे दिली जायची. आता मात्र लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढल्यामुळे तीनचाकी सायकल घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तीनचाकी सायकलमध्ये आता अनेक बदल झाले असून, ही सायकल शक्य तेवढी आकर्षक करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थी आणि सायकल
साधारण १५-२० वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचा आजच्या एवढा विस्तार झालेला नव्हता. शहरात शाळाही मोजक्याच होत्या आणि शक्यतो घरापासून तीन-चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश देण्याचा प्रघात होता. यामुळे त्या काळात बहुतांश शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सायकलवरून शाळेत ये-जा करायचे. त्याकाळी अनेक शाळांमध्ये सायकल पार्किंगसाठी खास व्यवस्था केली जायची. दुचाकी स्टॅण्डपेक्षाही सायकल स्टॅण्डवर जास्त गर्दी दिसून यायची, तसेच दुचाकी- चारचाकीचे प्रमाण त्या काळात आजच्या एवढे प्रचंड नव्हते. त्यामुळे मुलांनाही रस्त्यावर बिनधास्त सायकल चालविता यायची. आता मात्र शाळा ते घर हे अंतरही लांबले, तसेच रहदारीही वाढली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल हा आता सुरक्षित पर्याय राहिलेला नाही. अनेक शाळांच्या गाड्या उपलब्ध असल्यामुळे सायकलवरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मागच्या १५-२० वर्षांच्या तुलनेत निम्म्याने घटले आहे. 

सायकलवर उपजीविका 
सायकलवर उपजीविका असणाऱ्या लोकांचे प्रमाणही आज लक्षणीय आहे. फेरीवाले, भाजीवाले, वर्तमानपत्र विक्रेते, फुलविके्रते, फुगेवाले, इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती करून देणारे हे सर्व लोक आजही उपजीविकेसाठी सायकलवरच शहराच्या विविध भागांत फिरतात. याशिवाय कामगार मंडळीही आज त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचाच वापर करतात. मागील तीस- चाळीस वर्षांपासून ही मंडळी नियमितपणे सायकल चालवीत असून, आजही सायकल हाच त्यांचा आधार आहे.

Web Title: Bicycle: for Rich its status; Liveliness of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.