भाजपा इच्छुकांची फुलंब्रीत भाऊगर्दी
By Admin | Updated: August 18, 2014 00:38 IST2014-08-18T00:16:54+5:302014-08-18T00:38:05+5:30
साधी विरोधी पक्षाची भूमिकाही निटनेटकी बजावता न आलेल्या भाजपामध्ये केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर तब्बल दीड डझन उमेदवार इच्छुकांच्या यादीत जमा झाले आहेत.

भाजपा इच्छुकांची फुलंब्रीत भाऊगर्दी
फुलंब्री : गेली दहा वर्षे मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. या काळात साधी विरोधी पक्षाची भूमिकाही निटनेटकी बजावता न आलेल्या भाजपामध्ये केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर तब्बल दीड डझन उमेदवार इच्छुकांच्या यादीत जमा झाले आहेत. हे सर्व इच्छुक उमेदवार स्वतंत्ररीत्या मतदारसंघात फिरून आपणच उमेदवार असल्याचे भासवित आहेत. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या दोन्ही पंचवार्षिकमध्ये पराभव पचनी पडलेल्या भाजपाची यंदाच्या निवडणुकीतही फार आघाडी आहे, असे नाही. तरीही विधानसभा लढविण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या तब्बल अठरापर्यंत पोहोचली आहे. येथे इच्छुकच तेवढे आहेत, काम मात्र एकाचेही दिसून येत नाही. इच्छुक असणाऱ्या एकाही उमेदवाराने पक्ष वाढविणे, मेळावे, शाखा उघडण्यासारखी कामेही केलेली नाहीत. केवळ सोशल मीडियाच्या भरवशावर आपण निवडून येऊ ही एकच आशा या इच्छुकांना आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मोदी फॅक्टर चालेल आणि आपण या लाटेत आमदार होऊन जाऊ, या आशेवरच अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी एवढी झाली आहे की, आज एका गावात एक उमेदवार कार्यकर्त्यांसह येऊन गेला की दुसऱ्या दिवशी दुसरा उमेदवार आपल्या समर्थकांना घेऊन येतो आणि आश्वासनांची खैरात वाटून जातो. हा प्रकार मागील महिनाभरापासून जोरात सुरू आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. प्रत्येक इच्छुकाने आपापली वेगळी चूल मांडल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.