ईव्हीएमच्या विरोधात भारिपचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:07 IST2019-06-18T00:06:23+5:302019-06-18T00:07:08+5:30
भारिप- बहुजन महासंघाने ईव्हीएमच्या (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) विरोधात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ अशा घोषणा देत भारिप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

ईव्हीएमच्या विरोधात भारिपचे घंटानाद आंदोलन
औरंगाबाद : भारिप- बहुजन महासंघाने ईव्हीएमच्या (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) विरोधात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’ अशा घोषणा देत भारिप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. गेल्या लोकसभा निवडणुकीत ४८ मतदारसंघांत झालेल्या मतमोजणीत तफावत आढळून आली. तफावत पाहता ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करीत भारिपचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक विभागाकडे स्पष्टीकरण मागितले होते. देशाची लोकशाही टिकून राहण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर (मतपत्रिकेने) घेण्यात याव्यात, अशी मागणी भारिपने आंदोलनातून केली. ईव्हीएमच्या विरोधातील भूमिकेचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला देण्यात आले. आंदोलनात भारिपचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र शिरसाट, शहराध्यक्ष उद्धव बनसोडे, जिल्हा महासचिव श्रीरंग ससाणे आदींसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.