भांबर्डा ग्रामपंचायत चौथ्यांदा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:26+5:302021-01-08T04:09:26+5:30
महात्मा गांधी तंटामुक्ती विजेता पुरस्कारप्राप्त गाव, सन २०१५ शंभर टक्के वसुली पुरस्कार प्राप्त, आयएसओ नामांकन प्राप्त भांबर्डा ग्रामपंचायत ...

भांबर्डा ग्रामपंचायत चौथ्यांदा बिनविरोध
महात्मा गांधी तंटामुक्ती विजेता पुरस्कारप्राप्त गाव, सन २०१५ शंभर टक्के वसुली पुरस्कार प्राप्त, आयएसओ नामांकन प्राप्त भांबर्डा ग्रामपंचायत अशी गावाची ख्याती आहे.
समृद्धी महामार्गाच्या पट्ट्यात असणाऱ्या गावातील राजकारण धनदांडग्या शेतकऱ्यांमुळे यावेळेस रंगणार अशीच चर्चा सर्वत्र सुरू होती. दरम्यान, भांबर्डा ग्रामपंचायतीची निवडणूक सात जागांसाठी बिनविरोध पार पडली. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सात जागांसाठी सातच अर्ज दाखल करण्यात आल्याने यावेळेसही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते. भांबर्डा गावाने एकत्रितपणे संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुक काळात मतभेद, वाद-विवाद, सूडाची भावना, वायफळ पैसा खर्च होणे, आदी प्रकार होत असतात; परंतु ग्रामस्थांनी वेळीच एकत्र येत यावेळेसही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य
भांबर्डा येथील ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांपैकी संतोष भानुदास फुकटे, इंदूबाई भीमराव पठाडे, शीलाबाई राजेंद्र काळे, संगीता विजय काकडे, श्रीराम भवर, सुमनबाई शिवाजी दिवटे, सर्जेराव तेजराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.