दूषित पाण्यापासून सावधान
By Admin | Updated: July 28, 2014 01:00 IST2014-07-28T00:24:42+5:302014-07-28T01:00:28+5:30
नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत.

दूषित पाण्यापासून सावधान
नांदेड : पावसाळ््यात विविध आजार डोके वर काढत असून गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळातूनच आजार आपल्या घरात प्रवेश करीत आहेत. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावतात. यासाठी या मोसमात पाणी गाळून आणि उकळून प्यायला हवे. शिवाय या दिवसांत शिळे अन्न खाणे व वारंवार भिजत राहणेही आजाराला निमंत्रण देते.
पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे आजार वाढतात
कॉलरा, टायफाईडसारख्या आजारामध्ये भर पडते, म्हणूनच पाणी उकळून आणि गाळून घेण्याच्या सूचना डॉक्टर देत असतात. घराघरातून प्रत्येक गृहिणी या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत असतात. तरी गढूळ पाणायामुळे अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो. फक्त पाणी प्यायल्यामुळेच आजारांना तोंड द्यावे लागते. असे अजिबात नाही. तर पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळेही सर्दी, खोकला, ताप, येऊन अनेकांना अंथरुण धरावे लागते. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे स्किन इन्फेक्शन होणे, अॅलर्जी अशाही समस्या उद्भवतात. इतर ऋतूप्रमाणे पावसाळ््यातही स्वच्छ पाणीपुरवठा होत असला तरी पाणी भरताना, साठवताना आणि पितांना या तीनपैकी कोणत्यातही एका बाबतीत निष्काळजीपणा झाल्याने पाणी दूषित होते. यासाठी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.
डासांपासून सावध रहा
पावसाळ््यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते. अशा पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची अधिक पैदास होते.त्यामुळे या काळात मलेरिया,डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येते.याशिवाय स्किन इन्फेक्शनच्या समस्यासुद्धा अधिक प्रमाणात वाढतात. दूषित पाण्यामुळे जुलाब, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, हेपिटायटीस असे आजार उद्भवतात. गर्भवती स्त्रियांमध्ये हेपिटायटीस ई होण्याची शक्यता अधिक असते. सर्दी आणि खोकला हे आजार बऱ्याच प्रमाणात दिसून येतात.
महत्त्वाच्या टिप्स
ज्या भांड्यात आधी पाणी भरले, तेच भांडे न धुऊन घेता पुन्हा त्यात पाणी भरणे किंवा वॉश बेसिन तसेच टॉयलेटजवळ पाणी साठवून ठेवणे, यामुळे पाण्यातून इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते़ म्हणून आधीच पाणी भरलेल्या भांड्यात पुन्हा पाणी भरु नका़
पिण्याचे पाणी माठातून किंवा टाकीतून घेताना थेट ग्लास त्यात बुडवू नका़
खाता-पिताना हात स्वच्छ धुतलेले असतील, याची काळजी घ्या़
बाहेरुन स्वच्छ पाणी आले, तरी सोसायटीच्या टाक्यांमध्ये आजूबाजूला साचलेले पावसाचे खराब पाणी मिक्स होण्याचीही शक्यता असते म्हणूनच सोसायटीच्या टाकीत असे पाणी जाणार नाही, याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते़
आजार आणि लक्षणे
टायफाईड, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, थंडी वाजून ताप येणे, सांधेदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे, डोकेदुखी़
हेपिटायटीस ए आणि ई -डोळे पिवळे होणे, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, उलटी झाल्यासारखे वाटणे, बारीक ताप येणे़
गॅस्ट्रो, डायरिया : उलटी होणे, जुलाब होणे.
अशी घ्या काळजी...
बाहेरचे, रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये
जेवताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत़
पाणी गाळून आणि उकळून प्यावे,
फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावेत.
भाज्या नीट धुऊन, उकळून घ्या़
बाथरुममधून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्या.