२३ हजार शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’चा लाभ

By Admin | Updated: July 1, 2014 01:04 IST2014-07-01T00:23:55+5:302014-07-01T01:04:51+5:30

कळंब : कळंब तालुक्यातील २२८५० कृषीपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीच्या मुद्दल आणि व्याजात पन्नास टक्के सवलत देणारी कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर करण्यात आली

The benefits of 'Krishi Sanjivani' to 23 thousand farmers | २३ हजार शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’चा लाभ

२३ हजार शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’चा लाभ

कळंब : कोट्यवधी रुपये थकबाकीदार असणाऱ्या कळंब तालुक्यातील २२८५० कृषीपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीच्या मुद्दल आणि व्याजात पन्नास टक्के सवलत देणारी कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर करण्यात आली असून, सोमवारी या योजनेचा लाभ घेणाऱ्या व थकबाकीतून मुक्त होणाऱ्या कळंब तालुक्यातील गौर येथील दोन शेतकऱ्यांचा महावितरण कंपनीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महावितरण कंपनीच्या कृषीपंपधारकाकडे कंपनीची कोट्यवधी रुपयाची थकबाकी आहे. मध्यंतरी या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण कंपनीने राबविली होती. यावेळी कृषीपंपधारकांचा मोठा रोष शासनाला सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महावितरणने शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर करुन याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे.
लाभ घेणाऱ्या प्रथम शेतकऱ्याचा सत्कार
कळंब येथे सोमवारी महावितरण कंपनीच्या सहायक अभियंता कार्यालयात गौर येथील लिंबराज गोविंद गवळी व लक्ष्मण गोविंद गवळी या शेतकऱ्यांनी आपल्याकडील कृषी पंपाच्या थकबाकीची एकरकमी पन्नास टक्के रक्कम भरुन कृषी संजीवनी योजनेचा तालुक्यातून प्रथम लाभ मिळविण्याचा मान मिळविला. या शेतकऱ्यांचा सहाय्यक अभियंता एन.आर. खान यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी दुय्यम अभियंता बाळकृष्ण डोके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
कळंब तालुक्यात २२८५० कृषीपंप धारक शेतकरी असून, त्यांच्याकडे ३१ मार्च २०१४ अखेर मोठी थकबाकी आहे. या शेतकऱ्यांना कृषी संजीवनी २०१४ या योजनेचा लाभ घेवून पन्नास टक्के माफीचा लाभ घेता येणार आहे.
यासाठी एकरकमी पन्नास टक्के किंवा तीन मासिक हप्त्यात रक्कम भरण्याचे दोन पर्याय आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचे कळंब येथील महावितरणचे सहायक अभियंता एन.आर. खान यांनी सांगितले. (वार्ताहर)
काय आहे योजना ?
महावितरणच्या नव्या कृषी संजीवनी योजनेत ३१ मार्च २०१४ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार असून, एकूण थकबाकीच्या ५० टक्के रक्कम एकरकमी भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. याशिवाय एकरकमी रक्कम भरता येणे शक्य नसल्यास तीन समान मासिक हप्त्यात रक्कम भरल्यास उर्वरित पन्नास टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. फक्त ही रक्कम भरताना ३१ आॅगस्टपर्यंत २० टक्के, ३० सप्टेंबरपर्यंत २० टक्के व ३१ आॅक्टोबरपर्यंत उर्वरित १० टक्के रक्कम भरणा करणे गरजेचे आहे.
२२८५० कृषीपंपधारक
महावितरण कंपनीच्या या नव्या कृषी संजीवनी योजनेचा कळंब तालुक्यातील २२८५० कृषीपंप धारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, ज्या शेतकऱ्यांची पूर्ण थकबाकीतील मुद्दल व व्याजाची रक्कम भरण्याची ऐपत नाही त्यांच्यासाठी ही योजना एक अर्थाने संजीवनी देणारीच ठरणार आहे. महावितरण कंपनीच्या कळंब येथील सहायक अभियंता कार्यालयाने या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी विशेष मोहीम राबविली आहे.

Web Title: The benefits of 'Krishi Sanjivani' to 23 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.