छत्रपती संभाजीनगर : साेमनाथ सूर्यवंशीच्या परभणीतील पाेलिस काेठडीतील मृत्यूबाबत दाखल याचिकेच्या अनुषंगाने राज्य शासन, पाेलिस महासंचालक व राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) अधीक्षकांना नाेटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी मंगळवारी (दि. ८) हा आदेश दिला. साेमनाथच्या पाेलिस काेठडीतील मृत्यूच्या चाैकशीसाठी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ‘एसआयटी’ स्थापन करावी. गुन्हा दाखल करून, संबंधित पाेलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. या याचिकेवर २९ एप्रिल राेजी पुढील सुनावणी हाेणार आहे.
काय आहे याचिका ?साेमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला. साेमनाथचा पाेलिस काेठडीत पाेलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूची न्यायालयीन चाैकशी झालेली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ प्रमाणे त्याचा अहवालही सादर झालेला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने चाैकशी सुरू केलेली आहे, तसेच निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एल. आचलिया यांच्या आयाेगाकडूनही चाैकशी सुरू आहे. परंतु, याबाबत पाेलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. मारहाण करणारे संबंधित अधिकारी व पाेलिस कर्मचाऱ्यांच्या विराेधात कुठलीही कारवाई झालेली नाही. अद्याप त्यांचे निलंबनही झालेले नाही. न्यायालयीन चाैकशीनंतर कुठलीही कारवाईची प्रक्रिया किंवा कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित केलेली नाहीत. त्यामुळे याविराेधात साेमनाथच्या आईने ही याचिका दाखल केलेली आहे.
ॲड. आंबेडकर यांची ‘एसआयटी’ ची मागणीयुक्तिवाद करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचार प्रकरणात जशी ‘एसआयटी’ स्थापन केली होती. त्याप्रमाणे साेमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुद्धा ‘एसआयटी’ स्थापन करावी. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करावा आणि दाेषींवर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती केली. सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले.