आरटीओंचा कॅम्प होत नसल्याने चालकांना घालावे लागतात खेटे
By Admin | Updated: June 23, 2014 23:54 IST2014-06-23T23:54:06+5:302014-06-23T23:54:06+5:30
पाटोदा: येथे आरटीओ कार्यालयाचा कॅम्प होत नसल्याने नागरिकांना वाहनांच्या संदर्भात असलेल्या विविध कामांसाठी बीड येथे खेटे घालावे लागतात.

आरटीओंचा कॅम्प होत नसल्याने चालकांना घालावे लागतात खेटे
पाटोदा: येथे आरटीओ कार्यालयाचा कॅम्प होत नसल्याने नागरिकांना वाहनांच्या संदर्भात असलेल्या विविध कामांसाठी बीड येथे खेटे घालावे लागतात. यापोटी वाहनचालकांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.
पाटोदा येथे महसूल विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. त्यामुळे येथे पाटोदा तालुक्यासह आष्टी, शिरूर तालुक्यातील नागरिक सातत्याने येत असतात. पाटोदा येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय सुरु करावे अथवा येथे प्रत्येक महिन्यात दोन वेळेस आर.टी.ओं.नी कॅम्प घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून सातत्याने होत आहे. नागरिकांच्या मागणीकडे आर.टी.ओ.चा कानाडोळा असल्याने नागरिकांना मात्र नाहक हाल सहन करावे लागतात.
पाटोदा येथे कॅम्प होत नसल्याने आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यातील नागरिकांना बीड येथे जावेलागते. यासाठी ५० कि.मी. ते १५० कि.मी. पर्यंतच्या अंतरावरून जावे लागते. सौताडा, चिंचोली, कोतन, अंभोरा या भागातील नागरिकांना यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
आरटीओ कार्यालयात वाहन चालविण्याबाबत परवाना, परवान्याचे नूतनीकरण, नवीन वाहनांची नोंदणी, वाहनाची तपासणी, वाहनाचा कर भरणे, वाहन खरेदी- विक्री अशा विविध कामानिमित्त नागरिकांना बीड येथे जावे लागते. ही कामे एक ते दोन चकरांमध्ये होत नसल्याने नागरिकांना पाच ते सहा वेळा खेटे घालावे लागतात. नागरिकांचे असे हाल होऊ नयेत व त्यांचे काम वेळेवर व्हावे यासाठी पाटोदा येथे प्रत्येक महिन्यातून दोन वेळेस आरटीओ कार्यालयाने कॅम्प घ्यावा, अशी मागणी सय्यद रियाज, गणेश शेवाळे, यांच्यासह इतरांनी केली आहे.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ म्हणाले, आर.टी.ओ. कार्यालयाचा कॅम्प येथे घेण्यासाठी त्यांना सूचना देण्यात येतील. तर, आरटीओ खान या संदर्भात म्हणाले की, पाटोदा येथे लवकरच कॅम्प घेण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. (वार्ताहर)