कमल तलावाचे सुशोभीकरण ५० लाख रुपयांतून होणार
By Admin | Updated: July 1, 2014 01:07 IST2014-07-01T00:49:34+5:302014-07-01T01:07:30+5:30
औरंगाबाद : ऐतिहासिक कमल तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव आज प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता.

कमल तलावाचे सुशोभीकरण ५० लाख रुपयांतून होणार
औरंगाबाद : ऐतिहासिक कमल तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव आज प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता. समितीने त्यास मान्यता देऊन सुशोभीकरणासाठी वार्षिक योजनेतून चालू वर्षी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला.
नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना या तलावाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
तत्पूर्वी, या तलावाचा विकास आराखडाही तयार करण्यात आला होता. त्यावर सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आजच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांसह सर्वच सदस्यांनी त्यास मान्यता दिली.
नावीन्यपूर्ण योजनेतून चालू वर्षी या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे, असे थोरात यांनी सांगितले. शहरात शासनाने तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे केंद्र सुरू करावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. त्यावरही पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच असे केंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही दिले.
ट्रॅफिक गार्डनसाठी २५ लाख
सिद्धार्थ उद्यानात ट्रॅफिक पार्क उभारण्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रस्ताव मांडण्यात आला होता.
या ट्रॅफिक पार्कमध्ये लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जाणार आहेत. पोलीस आयुक्तांच्या या प्रस्तावानुसार २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.