विकासासाठी स्वबळावर होऊन जाऊ द्या
By Admin | Updated: July 12, 2014 00:41 IST2014-07-12T00:41:06+5:302014-07-12T00:41:06+5:30
अभिमन्यू कांबळे, हिंगोली आघाड्यांचे सरकार आल्यानंतर निर्णय घेताना अनेक अडचणी येतात, परिणामी स्थिर सरकार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांची नाराजी दूर कराव्या लागतात.
विकासासाठी स्वबळावर होऊन जाऊ द्या
अभिमन्यू कांबळे, हिंगोली
आघाड्यांचे सरकार आल्यानंतर निर्णय घेताना अनेक अडचणी येतात, परिणामी स्थिर सरकार देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांची नाराजी दूर कराव्या लागतात. त्यामुळे इच्छा असूनही विकास कामे करता येत नाहीत. हे सर्व टाळायचे असेल तर एकवेळ सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात व आपली ताकद दाखवून द्यावी, असा सूर ‘लोकमत’ कार्यालयात गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या परिचर्चेतून निघाला.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीबाबतच जोरात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे काही नेते स्वबळाचा नारा देतात. भाजपाच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीतही काही नेत्यांनी शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेतीलही काही नेत्यांनी भाजपाला आव्हान दिले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पक्षांनी एकदा स्वबळावर निवडणूक लढवावी, होवून जाऊ द्या एकदाचे, अशी घोषणा एका कार्यक्रमात केली होती. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ कार्यालयात गुरूवारी सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात का? या विषयावरील परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनकर देशमुख, राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा सरचिटणीस निश्चल यंबल, काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते विनायकराव देशमुख, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी अॅड. साहेबराव सिरसाठ, मनसेचे उपजिल्हा प्रमुख विनोद बांगर व ज्येष्ठ पत्रकार संजय घवाड यांनी सहभाग नोंदविला. या परिचर्चेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष बांगर, काँग्रेसचे विनायकराव देशमुख व शिवसेनेचे दिनकरराव देशमुख यांनी युती- आघाडी करून निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली तर इतरांनी स्वबळावरच सर्व पक्षांनी निवडणुका लढवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राष्ट्रवादीचे चव्हाण, बसपाचे अॅड. सिरसाठ, मनसेचे बांगर, पत्रकार घवाड, यंबल यांनी विकास साधण्यासाठी स्वबळावर लढणे आवश्यक असल्याचे सांगितले. आघाड्यांचे सरकार चालविताना पहिल्यांदा ते टिकवावे लागते. त्यानंतर निर्णय घ्यावे लागतात, हे निर्णयही मित्र पक्षाला कितपत योग्य वाटतात, हे सांगणेही अवघड जाते. त्यामुळे धोरणात्मक निर्णयही अनेकदा इच्छा असूनही घेता येत नाहीत. त्यामुळे एका पक्षाचे सरकार असेल तर निर्णय घेणे सोपे जाते. याकरीता स्वबळावर सर्व पक्षांनी निवडणुका लढवाव्यात, असे सांगितले.
कार्यकर्त्यांना संधी मिळेल- दिलीप चव्हाण
आत्तापर्यंतचा इतिहास पाहता आघाड्याचे सरकार चालविताना अनेक अडचणी येतात. गेल्या दहा वर्षात केंद्रात युपीए सरकारसमोर या अडचणी सातत्याने येत होत्या. त्यामुळे फार मोठे निर्णय घेता आले नाहीत. धोरणात्मक निर्णय घेत असताना मित्रपक्षांना विश्वासात घ्यावे लागते. हिच मोठी तारेवरची कसरत असते. वेगळे लढले तर अशी कसरत करण्याची गरज नाही. कारण एका पक्षाची सत्ता असल्यानंतर निर्णय घेताना सोपे होते. तसेच १५ ते २० वर्षापासून कार्य करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळते. तसेच ते पक्षासोबतही निष्ठेने काम करतील.
भाजपा-सेनेने एकत्रच लढावे- बाबाराव बांगर
शिवसेना- भाजपाची गेल्या २५ वर्षापासून अभेद्य युती आहे. एका विचाराने प्रेरित होवून ही युती करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पुढील काळातही भाजपा-शिवसेनेने एकत्रच लढविणे योग्य राहील. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात गेल्या १५ वर्षांत जनतेचे कुठलेही प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे त्यांना पराभवाची भीती वाटू लागली आहे. दोन्ही पक्षाच्या मिळून ८० जागा देखील राज्यात निवडून येणे कठीण आहे. पराभव समोर दिसू लागल्याने जनतेची लक्ष विचलीत करण्यासाठी अशी भाषा केली जाते. काँग्रेसवर दबाव टाकून जागा वाढवून घेण्यासाठी अशा पुड्या सोडल्या जातात.
फक्त सत्तेसाठी युती- आघाडी सुरू - अॅड. साहेबराव सिरसाठ
केवळ सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना- भाजपा व काँग्रेस- राष्ट्रवादीकडून युती व आघाडी करण्यात येते. स्वतंत्र लढायचे नसेल तर पक्षच निर्माण कशासाठी केले? याचे उत्तर या पक्षाच्या नेत्यांनी द्यावेत. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे. युती व आघाडीची ध्येयधोरणे सारखीच आहेत. फक्त त्यांचे झेंडे वेगळे आहेत. सत्ता कोणाला द्यायची, हे स्वतंत्र लढवून जनतेच्या दरबारात जा, मग कोण किती पाण्यात आहे? हे कळेल. आघाडी- युतीमध्ये देश किंवा समाजहिताचा विचार न करता वैयक्तिक हितालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यांची सर्व भाषा ढोंगी आहे.
आघाडी- युतीत धोरणात्मक निर्णयास विलंब- संजय घवाड
आघाडी व युतीच्या सत्तेच्या काळात नेहमीच धोरणात्मक निर्णय घेताना विलंब होतो हे गेल्या पंधरा वर्षांपासून राज्यातील राजकारणात पहावयास मिळत आहे. तसेच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतही याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे यातूनच धडा घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी एकवेळ स्वबळावर निवडणूक लढवावी. जेणेकरून ज्या-त्या पक्षांचे बळ किती आहे, हेही जनतेच्या दरबारातून कळून येईल. एका पक्षाचे सरकार सत्तेत असल्यानंतर पदांसाठी घोडाबाजार होणार नाही. शिवाय विकासाचे निर्णय घेता येतील.
युती तोडणे योग्य नाही- दिनकर देशमुख
शिवसेना-भाजपाची युती सर्वांत जुनी आहे. एका विचाराने झालेली ही युती आता तोडणे योग्य नाही. स्वबळावरच लढायचे असेल तर पुढील लोकसभा निवडणुकीपासून तसा निर्णय घ्या. कारण स्वबळावर लढण्यासाठी तयारी करावी लागते, याकरीता वेळ हवा असतो. त्यामुळे सध्यातरी शिवसेना-भाजपाने एकत्रच निवडणूक लढविणे योग्य राहील. काँग्रेस-राष्ट्रवादीने पाडापाडीचेच राजकारण आतापर्यंत केले आहे; परंतु आता त्यांचे दिवस संपले आहेत. जनता आघाडीला कंटाळली आहे. यापुढील काळात राज्यात युतीचेच सरकार सत्तेवर येणार आहे.
वेगळे लढल्यास जातीयवादी पक्षांना मदत- विनायकराव देशमुख
काँग्रेस- राष्ट्रवादीने सध्यातरी एकत्रच लढणे आवश्यक आहे. वेगवेगळे लढल्यास याचा फायदा शिवसेना-भाजपासारख्या जातीयवादी पक्षांना होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांनी आपसातील मतभेद विसरून पुन्हा एकदा विधानसभेत सत्ता मिळविण्याच्या दृष्टिकोणातून तयारी करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या विकासाचे दाखविण्यात आलेले मॉडेल फेल ठरल्याचे आता जनतेने ओळखले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाला आता जनता थारा देणार नाही. काँग्रेसच विकास करू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
मनसे स्वबळावर लढविण्यासाठी सक्षम- विनोद बांगर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरूवातीपासूनच स्वबळावर निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली. २००९ च्या निवडणुकीत यामुळे पक्षाला चांगले यश मिळाले. आताही स्वबळावरच लढण्यासाठी मनसे सक्षम आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी असो की, शिवसेना-भाजपा असो, या सर्व पक्षांनी सत्ता उपभोगल्या आहेत. आता त्यांना पुन्हा सत्तेची चटक लागली आहे म्हणून ते स्वबळाचा नारा देत आहेत. खरोखरंच त्यांनी त्यांची ताकद पहायची असेल तर एकदाचे स्वतंत्र मैदानात उतरावे. जाती-पातीचे राजकारण आता या पक्षांकडून करण्यात आले. आता हे राजकारण चालणार नाही.
कोणालाही बहुमत मिळणार नाही- निश्चल यंबल
आघाडी व युतीच्या राजकारणात सातत्याने विकास कामे करताना अडचणी येतात. एकाच पक्षाचे सरकार असल्यास अशा अडचणी येणार नाहीत. पुन्हा युती व आघाडी केल्यास कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षाने एकवेळ स्वबळावर निवडणूक लढविणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीतच पाडापाडीचे राजकारण झाले. स्वतंत्र लढल्यास असे प्रकार होणार नाहीत. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या ठिकाणी अनेक विकासाची कामे करण्यात आलेली आहेत.