उन्हाळी सोयाबीनचे बीजोत्पादन करून आत्मनिर्भर व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:10+5:302021-01-08T04:08:10+5:30
- कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला : तुटवड्याच्या शक्यतेमुळे उपाययोजना औरंगाबाद : सततच्या पावसामुळे विविध बियाणे कंपन्यांचे सीड प्लाॅट नापास ...

उन्हाळी सोयाबीनचे बीजोत्पादन करून आत्मनिर्भर व्हा
-
कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला : तुटवड्याच्या शक्यतेमुळे उपाययोजना
औरंगाबाद : सततच्या पावसामुळे विविध बियाणे कंपन्यांचे सीड प्लाॅट नापास होण्याची शक्यता बळावली आहे. त्यात यावर्षी चांगला भाव मिळाल्याने पुढील खरिपातही तेवढीच पेरणी अपेक्षित असल्याने बियाणांच्या तुटवड्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे त्यांनी १५ जानेवारीपर्यंत सोयाबीनची पेरणी करावी. उन्हाळी हंगामातील सोयाबीन बी लहान पडते, उत्पादनही कमी येते. मात्र, बियाणाची उगवण चांगली असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले.
जालना, बीड, औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यांत ३ लाख ९७ हजार ४४६ हेक्टरवर यावर्षी खरिपात सोयाबीनची पेरणी झाली होती. कृषी विभागाने सोयाबीन पेरलेल्या २७ हजार ८४२ शेतकऱ्यांना भेटून ३ लाख २३ हजार ४४० क्विंटल बियाणे पुढच्या खरिपासाठी राखून ठेवण्यात यश मिळविले आहे. गेल्या खरीप हंगामातही औरंगाबाद व लातूर विभागात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली; परंतु सोयाबीन बियाणाची उगवण अपेक्षित प्रमाणात झाली नाही. अनेक ठिकाणी पूर्ण पेरा वाया गेला. दुबार पेरणीची वेळ आली. बारा हजारांपेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर परतीच्या पावसाचा फटकाही सोयाबीनला बसला. त्यामुळे पुढच्या खरिपासाठी उन्हाळी सोयाबीनचे बीजोत्पादन करून आत्मनिर्भर व्हा, असा सल्लाच कृषी विभागाने आता दिला आहे.
पुढील खरीप हंगामात दर्जेदार सोयाबीन बियाणे किती प्रमाणात उपलब्ध होईल, याविषयी शंका असून, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावर भर द्यावा. उन्हाळ्यातील सोयाबीन बीजोत्पादनासाठी खरिपातील बियाणे वापरता येईल. हे बियाणे पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता घराच्या घरी तपासून घ्यावी. ७० टक्के किंवा त्यापेक्षा उगवण क्षमता जास्त आली तर ते पेरायला हरकत नाही; पण त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असेल, तर बियाणे पेरणीचे प्रमाण वाढवावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.