मुदतबाह्य औषधी साठ्यास ‘डीएचओं’ ना जबाबदार धरा
By Admin | Updated: May 8, 2015 00:25 IST2015-05-08T00:12:10+5:302015-05-08T00:25:19+5:30
जालना : मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या मुदतबाह्य औषधीसाठा प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी,

मुदतबाह्य औषधी साठ्यास ‘डीएचओं’ ना जबाबदार धरा
जालना : मानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या मुदतबाह्य औषधीसाठा प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ.भा. मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्याकडे गुरूवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, जालना तालुक्यातील मानेगाव येथे मुदतबाह्य औषधीसाठा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या पथकास आढळून आलेला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून तो अत्यंत गंभीर आहे. जिल्ह्यात प्रत्येक आरोग्य केंद्राची तपासणी केल्यास अशा प्रकारचा मुदतबाह्य साठा आढळून येऊ शकतो.
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर कसलेही नियंत्रण नसल्याने व ग्रामीण भागातील आरोग्य समस्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे मुदतबाह्य औषधीसाठ्यास त्यांना जबाबदार धरून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अॅड. शैलेश देशमुख, लिगल सेल जिल्हाध्यक्ष अॅड. सोपान शेजूळ, अशोक पडूळ, संतोष ढेंगळे, नितीन भोकरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)