कर्जास जामीनदार होताना घ्या काळजी; तुम्हालाही बसू शकतो फटका!
By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 1, 2024 18:45 IST2024-02-01T18:45:47+5:302024-02-01T18:45:55+5:30
कर्ज परतफेड न झाल्यास जामीनदारावरही कारवाई

कर्जास जामीनदार होताना घ्या काळजी; तुम्हालाही बसू शकतो फटका!
छत्रपती संभाजीनगर : अनेकांचा सर्वांना सहकार्य करून व कोणाच्या भावना दुखावण्याचा स्वभाव नसतो, यामुळे अनेक जण नातेवाईक, मित्रांनी घेतलेल्या कर्जाचे जामीनदार होतात. मात्र, आता जामीनदार होताना थोडे सावधान व्हावे लागणार आहे. कारण, काही कारणास्तव कर्ज थकीत झाले तर ती रक्कम त्या जामीनदाराकडून वसूल केली जाऊ शकते.
कर्ज परतफेड न झाल्यास जामीनदारावरही कारवाई
कर्ज घेणाऱ्याचे क्रेडिट स्कोअर समाधानकारक नसेल किंवा सर्वांत कमी असेल अशा वेळी बँक त्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला जामीनदार आणण्यास सांगते. जर तो कर्जदार घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर अशा वेळेस बँक जामीनदाराकडून कर्जाची रक्कम वसूल करते.
सिबिलला बसू शकतो फटका
एखाद्याला कर्ज घेण्यासाठी जामीनदाराने त्याची हमी घेतलेली असते. तेव्हाच बँक कर्ज देते. कर्ज घेणाऱ्याने कर्जाची परतफेड केली नाही तर अशा वेळी जामीनदाराकडून वसूल केली जाते. तसेच जामीनदाराच्या सिबिल स्कोअरवरही परिणाम होतो. यामुळे जामीनदाराला पुढे कोणतेही कर्ज घेताना अडचण येऊ शकते.
किती असावा सिबिल स्कोअर ?
उत्कृष्ट : ७०० च्यापुढे ८५० दरम्यान.
सरासरी : ६०० ते ७५० दरम्यान.
सर्वांत कमी : ३०० ते ५८० दरम्यान.
जामीनदार होताना काय काळजी घ्याल?
आपण ज्या व्यक्तीच्या कर्जाचे जामीनदार राहणार आहे त्या व्यक्तीचा आधीचे रेकॉर्ड तपासावे. कर्जदाराने घेतलेल्या कर्जाची परतफेड तो वेळेवर करू शकतो का, जेवढे कर्ज घेतले आहे तेवढी फेडण्याची क्षमता कर्जदारात आहे का, त्याने कशासाठी कर्ज घेतले या सर्व बाबी जाणून घेणे आवश्यक आहे.
जामीनदार म्हणजे कर्जफेडीची हमी
एखाद्याने कर्ज घेतले व त्याचा जामीनदार कोणी होत असेल तर बँकेच्या दृष्टीने तो जामीनदार म्हणजे कर्जफेडीची हमीच असतो. भविष्यात कर्जदाराने ईएमआय थकविला तर त्याचा परिणाम जामीनदाराच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. यासाठी जर कोणाच्या कर्जाची हमी घेत असाल तर तो व्यक्ती वेळेवर ईएमआय भरतो की नाही, याचा पाठपुरावा करणे जामीनदाराचे कर्तव्य आहे.
- रोहन आचलिया, सीए