सावधान ! स्वस्त कॅमेरा देण्याच्या नावाखाली डॉक्टरची ५ लाखांची ऑनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 20:07 IST2021-05-06T20:03:46+5:302021-05-06T20:07:59+5:30
रशस्टार4 या ईलेक्ट्रॉनिक कंपनीने सोशल मिडीयावर बाजार भावापेक्षा कमी किंमतीत कॅमेरा विक्री करत असल्याची जाहिरात केली.

सावधान ! स्वस्त कॅमेरा देण्याच्या नावाखाली डॉक्टरची ५ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पैठण : महागातील कॅमेरा स्वस्तात विकत घेण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या पैठण येथील डॉक्टरला भामट्यांनी ५ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. या प्रकरणी डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून रशस्टार4 या कंपनीतील १२ जणांवर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रशस्टार4 या ईलेक्ट्रॉनिक कंपनीने सोशल मिडीयावर बाजार भावापेक्षा कमी किंमतीत कॅमेरा विक्री करत असल्याची जाहिरात केली. पैठण शहरातील डॉक्टर ऋषीकेश मदन मानधने (३०, रा पंचायत समितीसमोर , पैठण ) यांनी कॅमेरा खरेदीसाठी ऑनलाइन बुकींग केली होती. दरम्यान या इलेक्ट्रॉनिक कंपनीचा सेल्स मॅनेजर व डिलिव्हरी एजंटने कस्टम ड्यूटी , शिफमेन्ट हँडओव्हर चार्जेस , स्टॅम्प ड्यूटी , एक्सरसाईज ड्यूटी आदी वेगवेगळी कारणे सांगून डॉ . मानधने यांना वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ४ लाख ८४ हजार ९ ०० रुपये ऑनलाइन जमा करायला लावले.
दरम्यान, डॉक्टरने कॅमेरा कधी पाठविता, असे विचारले असता सेल्स मॅनेजरने अजून ५५ हजार रुपये व विलंब शुल्क १ हजार २५० रुपये प्रतिदिन भरावे लागतील त्यानंतरच तुम्हाला कॅमेरा डिलिव्हर करण्यात येईल असे सांगितले. तसेच सदरील रक्कम न भरल्यास पैसेही परत मिळणार नाहीत असे स्पष्ट करून तुम्हाला काय करायचे ते करा असे धमकावले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर मानधने यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर पवार पुढील तपास करीत आहेत.