वैजापूर : फोन पेचा मॅनेजर बोलतो असे सांगून एका भामट्याने एका डाॅक्टरचे खाते हॅक करून खात्यावरून एक लाख रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश देवीदास जानराव असे फसवणूक झालेल्या डाॅक्टरचे नाव आहे.
गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील रहिवासी गणेश जानराव यांचा वैजापूर येथे लाडगावरोडवर दवाखाना आहे. जानराव यांनी १ एप्रिल रोजी स्वतःच्या फोन पे अकाउंटवरून आदर्श एजन्सीच्या नावे ४ हजार ३९८ रुपये पाठविले. सदर रक्कम त्यांच्या खात्यावरून डेबिट झाली. मात्र संबंधित एजन्सीला ती रक्कम पोहोचली नाही. याप्रकरणी त्यांनी नेवरगाव येथील एसबीआय बँकेच्या शाखेत जाऊन खात्याचे स्टेटमेंट काढले, तर सदर रक्कम त्यांच्या खात्यावरून कमी झाली होती. त्यांनी बँक मॅनेजरला विचारणा केली असता त्यांनी फोन पेच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
फोन पे च्या टोल फ्री नंबरवर जानराव यांनी संपर्क केला असता फोन पेच्या मॅनेजर शी बोलण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळी एका मोबाइलवरून जानराव यांच्या मोबाइलवर काॅल आला. मी फोन पेचा मॅनेजर बोलतो, तुमची रक्कम तुम्हाला भेटेल, असे सांगून त्यांनी जानराव यांचा खाते क्रमांक व पिनकोड नंबर विचारून घेतला. थोड्याच वेळात त्यांच्या खात्यावरून ९८ हजार २२९ रुपये रक्कम परस्पर काढून घेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे जानराव यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी गणेश जानराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे हे करीत आहेत.