पाच लाख प्रौढांना देणार बीसीजी लस; जिल्हा आरोग्य विभागाकडून होणार घरोघरी सर्वेक्षण

By विजय सरवदे | Published: April 25, 2024 04:39 PM2024-04-25T16:39:32+5:302024-04-25T16:40:53+5:30

क्षयरोगमुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात क्षयरुग्ण शोधमोहीम राबवून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

BCG vaccine to be given to five lakh adults; Door to door survey to be conducted by District Health Department | पाच लाख प्रौढांना देणार बीसीजी लस; जिल्हा आरोग्य विभागाकडून होणार घरोघरी सर्वेक्षण

पाच लाख प्रौढांना देणार बीसीजी लस; जिल्हा आरोग्य विभागाकडून होणार घरोघरी सर्वेक्षण

छत्रपती संभाजीनगर : क्षयरोग (टीबी) रोखण्यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांना बीसीजी लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तथापि, हे ऐच्छिक लसीकरण आहे. यासंदर्भात लवकरच जिल्हाभरात आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार असून, लसीकरणासंदर्भात पात्र लाभार्थ्यांकडून लेखी संमती घेतली जाणार आहे.

आरोग्य विभागाने सन २०२५पर्यंत टीबी निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे. क्षयरोगमुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात क्षयरुग्ण शोधमोहीम राबवून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रोगावर मात करण्यासाठी बीसीजी लस ही सगळ्यात प्रभावी उपाय समजला जातो. त्यानुसार प्राैढ व्यक्तींनाही बीसीजी लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची ही मोहीम साधारणपणे जून महिन्यात सुरू होईल. यासंदर्भात आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी जि. प. आरोग्य विभाग सध्या राज्यस्तरावरून फॉर्मची प्रतीक्षा करीत आहे.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, ही लस वयाची ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, मागील पाच वर्षांच्या कालावधीत ज्यांना क्षयरोग झाला आहे. गेल्या तीन वर्षांत क्षयरुग्णांच्या सहवासात राहिलेल्या व्यक्ती. जे धूम्रपान करतात अथवा जे यापूर्वी धूम्रपान करीत होते. मधुमेह असलेल्या व्यक्ती तसेच ज्यांचा बॉडी मास्क इंडेक्स (बीएमआय) हा १८ पेक्षा कमी आहे, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा कुपोषित प्रौढ व्यक्तींना दिली जाणार आहे.

सुरक्षित लस; संमती घेणार
नवजात बालकांना जन्मानंतर २४ तासांच्या आत ही लस टोचली जाते. या लसीमुळे मुलांना टीबी होण्याची शक्यता कमी होते. ही लस सुरक्षित असल्यामुळेच प्रत्येक आई ही आपल्या बाळाला लस टोचून घेण्यास संमती देत असते. आता १८ वर्षांवरील प्रौढांना सर्वेक्षणाच्या वेळी पात्र लाभार्थ्यांकडून संमती घेतली जाणार आहे.
- डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

लस कोणाला द्यायची नाही
या लसीकरण सत्रामध्ये १८ वर्षांवरील कमी वय असलेल्या व्यक्ती, ज्या व्यक्ती संमतीपत्रावर सही करणार नाहीत, अशा व्यक्ती, ज्यांना ‘एचआयव्ही’चा पूर्वेइतिहास आहे, अशा व्यक्ती, गरोदर किंवा स्तनदा माता, इतर आजाराचा उपचार घेत असणाऱ्या व्यक्तींना बीसीजी लस दिली जाणार नाही.

Web Title: BCG vaccine to be given to five lakh adults; Door to door survey to be conducted by District Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.