गंगापुरात काट्याची लढत अटळ

By Admin | Updated: June 20, 2014 01:10 IST2014-06-20T01:02:16+5:302014-06-20T01:10:55+5:30

लालखाँ पठाण, गंगापूर गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

The battle for the thorn in Gangapur is inevitable | गंगापुरात काट्याची लढत अटळ

गंगापुरात काट्याची लढत अटळ

लालखाँ पठाण, गंगापूर
गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाची निवडणूक रंगतदार ठरणार असून, खरी लढत काँग्रेस आघाडी, शिवसेना व विद्यमान अपक्ष आमदार प्रशांत बंब यांच्यात होणार असली तरी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मतदारसंघ पिंजण्यास सुरुवात केली आहे. आ. बंब यांच्यावरील नाराजीचा फायदा कोण उचलणार हे तिकीट वाटपानंतर कळेल पण काट्याची लढत मात्र अटळ आहे.
मागील निवडणुकीत शिवसेनेचे अण्णासाहेब माने यांचा प्रशांत बंब (अपक्ष) यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुंडलिकराव माने चौथ्या क्रमांकावर होते.
अण्णासाहेब माने दोन वेळा निवडून गेले. मागच्या तिसऱ्या निवडणुकीत मात्र अपक्ष प्रशांत बंब यांनी ‘चला लढू या, बदल घडवू या’ असा नारा देत सर्व मातब्बरांना आस्मान दाखवले.
यावेळी ‘चला लढू या, बदल घडवू या’ असा नारा चालणार नाही. आ. बंब वेगळी चाल खेळतील. मागील वेळेला त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते. आता दोन्ही तालुक्यांत त्यांनी कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. परंतु गेली पाच वर्षे ‘चला लढू या, बदल घडवू या’ हा त्यांचा नारा पोकळ ठरला. कुठलाही बदल ते घडवू शकले नाहीत. त्यामुळे यंदाची निवडणूक बंब यांना सोपी नाही.
काँग्रेसमध्येदेखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. खुलताबादचे जगन्नाथ खोसरे, गंगापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजय जाधव, डोणगाव येथील जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून, राष्ट्रवादीमध्ये विधानसभा अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, तालुकाध्यक्ष हरिभाऊ डव्हाण, खुलताबादचे तालुकाध्यक्ष राजू वरकड, विलासराव चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
गंगापूर-खुलताबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर कृष्णा पाटील डोणगावकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मनसेचे जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव, बादशाह पटेल, जि.प. सदस्य शैलेश क्षीरसागर, दिलीप बनकर तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सर्जेराव चव्हाण, भाजपाचे किशोर धनायत यांची नावेही चर्चेत आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत घडले तसेच घडेल या आशेने शिवसेनेत आतापासूनच रस्सीखेच सुरू आहे. अण्णासाहेब माने, अंबादास दानवे, दिनेश मुथा, मनोज जैस्वाल, अरुण रोडगे, खुलताबादचे कारभारी जाधव, युवा सेनेचे संतोष माने उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.
गंगापूरचे तालुका प्रमुख प्रकाश डुबेदेखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे तालुक्यात हक्काचे २५ ते ३० हजार मतदान आहे. पण सत्ता नसल्यामुळे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेपासून दूर गेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लासूर बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील डोणगावकर वर्षभरापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
वडील माजी खा. दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांची पुण्याई, तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा, प्रत्यक्ष संपर्क व विविध माध्यमांतून केलेली सामाजिक कार्ये ही त्यांची जमेची बाजू. पण जागा कुणाला सुटते,यावर बरेच काही अवलंबून आहे.

Web Title: The battle for the thorn in Gangapur is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.