आधारच झाले निराधार
By Admin | Updated: August 9, 2015 00:25 IST2015-08-09T00:07:49+5:302015-08-09T00:25:56+5:30
कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे एका नाल्यात शनिवारी सकाळी सुमारे चारशे आधारकार्ड ग्रामस्थांना आढळून आले.

आधारच झाले निराधार
कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथे एका नाल्यात शनिवारी सकाळी सुमारे चारशे आधारकार्ड ग्रामस्थांना आढळून आले. यातील बहुतांश कार्डवरील नावे जुळल्याने ग्रामस्थ ती घेऊन गेली. दरम्यान, या प्रकाराने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थ आधार कार्ड काढण्यासाठी दररोज ई सेवा केंद्रात खेटे घारत आहेत. परंतु कार्ड काही केल्या मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी काही ग्रामस्थांना गावातील एका नालीत शेकडो आधार कार्ड असलेली एक बेवारस बॅग आढळून आली. ग्रामस्थांनी ती उघडली असता यात २०११ नोंदणी केलेले शेकडो आधार कार्ड होते. आधार कार्ड वाटपाचे काम पोस्टाचे होते. परंतु हा गठ्ठा बाहेर कसा पडला. कोणी नेला याची उत्तरे पोस्ट मास्तर देऊ शकले नाहीत. सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार लक्षात आल्याने संतप्त शेकडो ग्रामस्थ पोस्ट आॅफीसजवळ जमा झाले. पोस्टमास्तर शिराळ यांना धारेवर धरले. ग्रामस्थांचे रौद्ररुप पाहून काही वेळातच कार्यालय बंद करुन पोस्ट कर्मचारी निघून गेले.
याविषयी पोस्टमास्तर गजानन शिराळ यांना विचारले असता, सदर गठ्ठा पोस्ट कार्यालयाचा आहे. यात सापडलेले कार्ड २०११ मधील आहेत. त्यावेळी मी येथे नव्हतो. त्यामुळे याविषयी अधिक काही मी सांगू शकत नाही. (वार्ताहर)
गावातील हजारो ग्रामस्थांनी आधार कार्डची नोंदणी केलेली नाही. त्यांना अद्यापही कार्ड मिळालेले नाही. परंतु नालीत ही कार्ड आढळून आल्याने ग्रामस्थांना पोस्टाच्या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पोस्टाकडे आलेली सर्व कार्डचे तात्काळ वाटप करावे, अशी मागणी जोर धरत आहे.