पायाभूत चाचणी सक्तीची

By Admin | Updated: July 27, 2016 00:50 IST2016-07-27T00:19:29+5:302016-07-27T00:50:19+5:30

औरंगाबाद : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी पायाभूत चाचणी गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे

Basic testing compulsory | पायाभूत चाचणी सक्तीची

पायाभूत चाचणी सक्तीची


औरंगाबाद : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी पायाभूत चाचणी गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षातील २८ आणि २९ जुलै रोजी होणारी ही पहिलीच चाचणी असेल. गुरुवारी व शुक्रवारी अशा दोन दिवसांत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या तसेच सर्व बोर्डाच्या शाळांना ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम भाषा व गणित विषयाच्या तीन पायाभूत चाचण्यांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सर्व शाळांना प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. सोमवारपर्यंत उर्दू माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मात्र शाळास्तरापर्यंत पोहोचल्या नव्हत्या. प्रथम भाषेत लेखी चाचणी २८ जुलैला, तर गणित विषयाची चाचणी २९ जुलैला घेतली जाणार आहे. या चाचणीमध्ये लेखी परीक्षेसोबतच तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षाही त्याच दिवशी घेण्याचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांचे आदेश आहेत.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नसल्याचा गैरसमज पालकांमध्ये निर्माण झाला होता. या माध्यमातून तो दूर करण्याचाही शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत.
विशेष म्हणजे, जि.प. प्राथमिक शाळांसाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी चाचण्यांचे नियोजन केले होते. त्यासंबंधी एक पुस्तकही तयार करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जिल्हास्तरावर या चाचण्या घेण्यात आल्या. यंदा मात्र, प्रवेश पंधरवडा आणि अन्य कार्यक्रमांमुळे जून महिन्यात ही चाचणी घेणे शाळांना शक्य झाले नाही.

Web Title: Basic testing compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.